मोहाडी: महाप्रसाद घेणाऱ्यांना कार ने उडविले, 8 जण गंभीर

मोहाडी ◼️मारुती कारचे स्टेरींग लॉक होऊन ती समोरच महाशिवरात्री निमित्त सुरू असलेल्या महाप्रसादाच्या मंडपात शिरली. यामुळे झालेल्या अपघतात 8 जण गंभीर जखमी झाले. सदर घटना मोहाडी येथील श्री संत जगनाडे चौकातील महादेव मंदिरासमोर आज 18 रोजी दुपारी घडली.

मोहाडी येथील बायपास रोडवर असलेल्या महादेव मंदिराच्या समोर महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर दरवर्षीप्रमाणे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास भंडारा येथील निरज लाला बनकर (45) कुटुंबातील सदस्य हे कार क्रमांक एमएच 12/जीएफ 3008 ने महाशिवरात्री निमित्ताने देवदर्शनाला जात होते. दरम्यान अचानक त्यांच्या कारचा स्टेरींग लॉक झाल्याने चारचाकी अनियंत्रीत झाली व महाप्रसाद मंडपात शिरली. यावेळी मंडपात उभे असलेल्या भाविकांवर कार गेल्याने आठ जण जखमी झाले. सर्व जखमींना मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी सहा जणांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले. अपघातामुळे येथे आप्तस्वकीयांची एकच गर्दी होऊन काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Share