1 लाख 20 हजाराची लाच घेताना नगरपंचायतचा स्थापत्य अभियंता व लिपिक एसिबीच्या जाळ्यात

भंडारा ◼️जमिनीला विकासात्मक परवानगी देण्यासाठी आणि जमीन अकृषिक करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 लाख 20 हजाराची लाच मागणाऱ्या नगर पंचायतीच्या स्थापत्य अभियंत्याला आणि अन्य दोन व्यक्तींना 1 लाख रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. लाखांदूर नगर पंचायतीच्या हद्दीत तक्रार करणाऱ्या व्यक्तीची जमीन आहे. जमिनीला विकासात्मक परवानगी देण्यासाठी व ती अकृषक करण्यासाठी तक्रार करणाऱ्या व्यक्तीने अर्ज केला. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी लाखांदूर नगर पंचायतीचे प्रभारी स्थापत्य अभियंता गजानन कराड आणि लिपिक विजय करंडेकर यांनी केली. याची तक्रार नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर तक्रारीची पडताळणी 2 फेब्रुवारी करण्यात आली. त्यात तथ्य आढळून आल्यानंतर 16 फेब्रुवारी सापळा रचण्यात आला. यात अभियंता आणि लिपिक यांच्य सांगण्यावरून कंत्राटी कर्मचारी मुखरण देसाई यांनी 1 लाख रुपयाची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच कंत्राटी व्यक्ती आणि दोन्ही अधिकाऱ्यांना पथकाने ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक योगिता चाफले, पोलीस निरीक्षक वर्षा मते, आशिष चौधरी, पोलीस नायक अमोल मेंघरे, अनिल बहिरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाई यशस्वी केली.

Print Friendly, PDF & Email
Share