पीएम श्री योजने अंतर्गत शाळांचा होणार सर्वांगीण विकास

गोंदिया◼️नुकताच राज्यातील 846 शाळांचा सर्वांगीण विकास करणार्‍या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पात्र 19 शाळांचा समावेश करण्यात आलेला असून जिल्हा परिषदमार्फत राज्य प्रकल्प संचालकांना यादी सादर करण्यात आलेली आहे. या योजनेकरिता 1 कोटी 88 लक्ष रुपयांचा निधी 5 वर्षात खर्च करण्यात येईल, अशी माहिती गोंदिया जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिली.

यात आमगाव तालुक्यातील करंजी व तिगाव येथील जिप शाळा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, निमगाव व अर्जुनी मोर येथील शाळा, देवरी तालुक्यातील पुराडा, भागी व देवरी येथील शाळा, गोंदिया तालुक्यातील एकोडी, रतनारा येथील जिप शाळा व गोंदिया येथील मनोहर म्युन्सिपल उच्च शाळा, गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार व तुमखेडा येथील शाळा, सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा व खाडीपार येथील, सालेकसा तालुक्यातील झालिया व विचारपूर शाळा आणि तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा व कोडेलोहारा जिप उच्च प्राथमिक शाळेचा समावेश आहे.

मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार : रहांगडाले

पीएम श्री योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शाळांची यादी मुंबई येथे जिल्हा परिषदेच्या मार्फत पाठवण्यात आली आहे. जिल्हा हा मागासलेला जिल्हा असून फक्त 19 शाळांची निवड करण्यात आली असल्याने इष्टांक वाढवण्याची विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व मंत्रालयस्तरावर करणार असल्याची माहिती जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email
Share