अखेर, मुल्ला येथील मनरेगा भ्रष्टाचारावर कायदेशीर कारवाईचे आदेश

देवरी : पंचायत समिती देवरी अंतर्गत ग्रामपंचायत मुल्ला येथे मनरेगा योजनेतून झालेल्या नियमबाह्य खडीकरण व सिमेंटीकरण रस्ते बांधकामातील दोशींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश लाडे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. तक्रारीची दखल घेत चौकशी अहवालानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उपजिल्हा अधिकारी (रोहयो) सचिन गोसावी यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) यांना दिले आहे.

देवरी पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायत मुल्ला येथे मनरेगा योजनेतून झालेली तसेच सुरू असलेली रस्ते खडीकरण व सिमेंटीकरण बांधकामे नियमबाह्य, निकृष्ट व अपुऱ्या साहित्याच्या वापराने होत असल्यास त्या रस्ते बांधकाम साहित्याचे देयक थांबविण्याची मागणी लाडे यांनी देवरीचे खंडविकास अधिकारी यांना केली होती. त्या अनुषंगाने चौकशी अधिकारी शाखा अभियंता डी. एस. सोमलवार, स्थापत्य अधिकारी साबळे यांच्यामार्फत सदर बांधकामाची चौकशी करण्यात आली. चौकशीतून ९ रस्ते खडीकरण बांधकामे ८० एम एम दगडा विनाच तर एका बांधकामात ४० एमएम दगडाचा वापर केला नसून फक्त मुरूमच टाकले असल्याचे तसेच एका ठिकाणी बांधकाम न होताच मजुरीचे देयक दिल्याचे, शिवाय एका रस्त्यावर सिमेंटीकरण झाल्याने त्या खडीकरण रस्त्याची चौकशी करता आले नसल्याचे चौकशी अहवालात अधिकाऱ्यांनी निष्कर्ष दिला होता.

त्या बांधकामांत घोळ झाल्याचे आरोप करीत बांधकाम साहित्याचे देयक थांबवून, अंदाजपत्रकानुसार बांधकाम करावे, बांधकामाची देयके थांबविण्यात यावी, बांधकामांवर झालेला खर्च, मजुरांच्या देयकाची रक्कम सरपंच, सचिव तसेच मनरेगा योजनेतील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वसूल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासंबंधीची तक्रार लाडे यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांना केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने रस्ते खडीकरण व सिमेंटकरण बांधकामांच्या चौकशी अहवालानुसार कायदेशीर कारवाईचे आदेश उपजिल्हाधिकारी (रोहयो) सचिन गोसावी यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) यांना दिले आहे. यासंबंधीचे पत्र 3 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आले आहे. चौकशी अहवालानुसार रस्ते बांधकामातील जबाबदार दोषी‌ सरपंच, सचिव व मनरेगा योजनेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होणार? याकडे जिल्हावाशियांचे लक्ष लागले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share