एक वर्षापूर्वी भूमीपूजन झालेल्या बाघनदीवरील पुलाचे बांधकाम रखडले
सालेकसा◼️ तालुक्यातील बोदलबोडी ते भजेपार दरम्यान बाघनदीवर पूल बांधकामाचे भूमिपूजन वर्षभरापूर्वी झाले असले तरी प्रत्येक्षात बांधकामाचा मुहुर्त निघाला नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. बांधकामला सुरूवात करावी, आवागमनास होणार्या त्रासातून परिसरातील जनतेची मुक्तता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुका आदिवासी, जंगलव्याप्त, दुर्गम नक्षलप्रभावी आहे. आजही येथे दळणवळणासह आरोग्य, उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधा नाहित. बोदलबोडी-भजेपार हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील बाघनदीवर पूल बांधकामासाठी क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून 6 कोटी रुपये मंजूर करून घेतले. गतवर्षी 28 फेब्रुवारी रोजी पुल बांधकामाचे भूमिपूजनही झाले. परंतु, एक वर्षाचा कार्यकाळ लोटूत असताना पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. बाघनदीवर पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, देवेंद्र पटले यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे
बाघनदीवर पूलाचे बांधकाम व्हावे यासाठी परिसरातील 12 ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन शासनाकडे पाठविला होता. तसेच सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. नागरिकांची गरज लक्ष्यात घेत तत्कालीन शासनाने बांधकामास मंजूरी प्रदान करून निधिची तरतूदही केली. थाटात भुमीपूजनही झाले. यानंतर काही महिन्यातच राज्यात सत्तांतर झाले आणि माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक आतापर्यंत पुलाचे बांधकाम सुरूच झाले नाही. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, बोदलबोडी ते भजेपार मार्गावरून विद्यार्थी, कामगार, लघु व्यवसायी, शेतकरी यांची नेहमी वर्दळ असते. पावसाळ्यात येथून मार्गक्रम करणे कठीण होते.
बांधकामात तांत्रिक अडचण निर्माण झाली. पुलाच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करण्यात आला आहे. आता बांधकामातील तांत्रीक अडचणी शासनाने दूर केल्या आहेत. कार्यारंभ आदेशही मिळाला आहे. पुढील महिन्याच्या सुरवातील बांधकामाला सुरूवात होणार असल्याचे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता टी. एस. तुरकर यांनी सांगीतले.