एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कुलचे १७ आदिवासी विद्यार्थी जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण

देवरी : गोंदिया जिल्हयाच्या इतिहासात प्रथमच जेईई (मुख्य परीक्षा) सारख्या कठीण पात्रता परिक्षेत जिल्हयातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कुल, बोरगाव/बाजार येथील १७ आदिवासी विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन यश संपादीत केले व आपल्या प्रतिभेचा झेंडा रोवला आहे.

          यावर्षी नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) व्दारा घेण्यात आलेल्या जेईई पात्रता परिक्षेचा निकाल मंगळवारी ०७ फेब्रुवारी  रोजी जाहीर झाला. अभियांत्रिकी पात्रता परिक्षेत नक्षलग्रस्त व दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हयातील देवरी प्रकल्पातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील १७ विद्यार्थ्यांनी अतुलनीय असे यश संपादीत केले आहे. या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अभ्यास करुन आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली.  देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी, एनआयआयटी अभियांत्रिक महाविद्यालयात शासकीय कोट्यातुन प्रवेश मिळविण्यासाठी ही परिक्षा उतीर्ण होणे अनिवार्य असते. या परिक्षेची पातळी अत्यंत कठीण समजली जाते.

          गोंदिया जिल्हयातील देवरी प्रकल्पांतर्गत विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी यांचे मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र विषयांच्या उपलब्ध करुन दिलेल्या नोट्सचा वापर करुन एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कुल, बोरगाव/बाजार या शाळेत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. त्यांच्या शिकवणीची संपूर्ण धुरा शाळेचे प्राचार्य संजय बोंतावार व विषय शिक्षकांनी सांभाळली.

          प्रकल्प कार्यालयातर्फे एकुण ४० आदिवासी विद्यार्थ्यांची परिक्षेसाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी १२ मुलांनी व ५ मुलींनी जेईईची परिक्षा उतीर्ण केली. स्कोअर सुधारण्यासाठी त्यांना पुन्हा एप्रिलमध्ये परीक्षा देता येणार आहे. प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांचे या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. संजय बोंतावार या उपक्रमाचे समन्वयक व समुपदेशक सारंग मेश्राम आहेत. या उपक्रमाला रविन्द्र ठाकरे, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय विकास राचेलवार, संजय बोंतावार (प्राचार्य) यांचेसह पालकांना दिले आहे.

यशवंत विद्यार्थ्यांची नावे :- सोनम सहाळा, अर्चना कुंभरे, प्रतिक्षा सलामे, आशिष पुराम, देवेश सयाम, गिरीश नैताम, श्रीकांत उईके, सौरव कोरेटी, रितेश उईके, गेवेंद्र भोयर, कुणाल कोकोडे, पुरुषोत्तम कलारी, टेकेश्वर भोयर, प्रशांत अलोने, संकेत कुमडे, सोनालीताई कल्लो, देवेंद्र ताराम आदींचा समावेश आहे.

उपक्रमाची माहिती :- आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम आहे. अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशपूर्व परिक्षेचा अभ्यास करुन घेतला जातो. प्रत्येक वर्षी मे महिन्यात मिशनशिखर (क्रॅशकोर्स) सुरु करण्यात येते.

Share