भ्रष्टाचारः मुल्ला येथे मनरेगा योजनेच्या बांधकामांत ‘घोळ’ चौकशीतुन उघड

◼️चौकशीमधे माहिती उघड, जिल्हाधिकारी आणि सीईओ कडे तक्रार

देवरी ◼️ गाव विकासासाठी कार्यान्वित असलेली मनरेगा योजना काही पदाधिकारी, अधिकारी व कंत्राटदारांसाठी पैसे कमावण्याचे माध्यम ठरल्याचे योजनेत झालेल्या अनेक गैरप्रकारांवरून स्पष्ट होते. असाच काहीसा प्रकार पंचायत समिती देवरी अंतर्गत मुल्ला ग्रामपंचायत येथे उघड झाला आहे. ज्या रस्त्याचे खडीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले, त्यात अंदाजपत्रकाप्रमाणे बांधकाम साहित्याचा वापरच करण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर जे काम झालेच नाही, त्या कामाचे मजुरीचे 21 हजार 824 रुपये उचल करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार चौकशीतून उघड झाला आहे. असे असताना अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाही. योजनेत झालेल्या नियमबाह्य खडीकरण, सिमेंट रस्ते बांधकामातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुरेश लाडे यांनी जिल्हाधिकारी, सिईओ यांचेकडे केली आहे.

मुल्ला येथे मनरेगा योजनेतून अगोदर झालेली व सुरू असलेली रस्ते खडीकरण व सिमेंटीकरण बांधकामे नियमबाह्य, निकृष्ट व अपुर्‍या साहित्याच्या वापराने होत असल्याने बांधकाम व साहित्याचे देयक थांबवून चौकशीची मागणी लाडे यांनी देवरीचे खंडविकास अधिकारी यांचेकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने शाखा अभियंता डी. एस. सोमलवार व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर. एल. साबळे यांची चौकशीसाठी निवड केली. या अधिकार्‍यांनी मुल्ला गावातील कामांची मौका चौकशी केली. चौकशीत 9 रस्त्यांच्या खडीकरणात मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे 80 एमएम, काही बांधकामांत 40 एमएम गिट्टीचा वापर करण्यात आला नसल्याचे तसेच काही बांधकामांत फक्त मुरूमाच वापर करण्यात असल्याचे व एक काम न करताच मजुरीची 21824 रुपये देण्यात आले. एका रस्त्यावर सिमेंटीकरण झाल्याने त्या खडीकरण रस्त्याची चौकशी करता आली नसल्याचे चौकशी अधिकार्‍याने निष्कर्ष अहवाल दिला आहे. सर्व बांधकामांची देयक थांबवून मंजूर अंदाजपत्रकानुसार साहित्याचा वापर न झालेल्या रस्त्यांची कामे थांबवावी, कामांवर खर्च झालेली रक्कम सरपंच, सचिव, मनरेगा योजनेतील अधिकार्‍यांकडून वसूल करून त्यांच्यावर कारवाई करावी, सर्व कामे अंदाजप्रकाप्रमाणे करावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे मुल्ला येथील रहवासी सुरेश लाडे यांनी केली आहे.

Share