गुजगोष्ट…
सोडून पिंजरा, घे भरारी
कवेत घे रे रानपाखरा
ही खुली आसमंते सारी!
धनी जणांची पिलावळ ही
तव रूपावर बघ भाळलेली
सज्ज जाहली तुज कैदन्या
मोहास बळी पडशील का?
पंख सशक्त हे तव खुडूनी
पिंजऱ्यात शोभेच्या ठेवतील डांबूनी
मोहात फसून अनार दाण्याच्या
भरारीस मुक्त हूकशील का?
मूठभर दाण्यांसाठी पोपटपंची
सांग तुजला जमेल का रे?
हाजी हाजी जी हुजूर करण्या
वेड्या तू लाचार का रे?
भाकीते मिथ्य वर्तविणे
अन भद्र जणांशी फसवणे
जमेल का रे,सांग तुजला
मूर्ख जगास बनविणे?
उपयोग मूल्य रे तव जाणूनी
शिकाऱ्यांची औलाद कशी ती
सापळ्यात ठेवील तुला बांधुनी
स्व जणांशी घातकी ठरशिल का?
एकदाच मिळते हे जीवन रे
व्यर्थ मरणाशी भिऊन जगणे
मुक्त पनातील ऐश्वर्य त्यागून
जीवन गुलामीत घालशील का?
कवी-
दिक्षांत प्रेमलाल धारगावे (शिक्षक) चीचगड