एनएमएमएस प्रणाली रोखणार मग्रारोहयोतील घोटाळे
गोंदिया◼️रोजगाराचा वणवा असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांना मग्रारोहयो योजना वरदान ठरली आहे. दुष्काळात या योजनेने शेतकरी, शेतमजुरांना मोठा आधार दिला. तंत्रज्ञानाच्या युगात योजना बदलली, परंतु काही त्रुटी तशाच राहिल्याने भामट्यांनी ही योजना पोखरून टाकली असल्याच्या अनेक प्रकार गावोगावी उघडकीस येत असल्याने ‘रोजगार हमी ः अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ अशी खिल्ली उडविली जात असल्याने आता योजनेतील घोटाळे ‘एनएमएमएस’ (नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम) प्रणाली रोखणार आहे.
केंद्र व राज्य सरकारने या योजनेत मोठी पारदर्शकता आणली आहे. यातून थोडाही घोटाळा होऊ नये यासाठी रोहयोच्या सार्वजनिक कामांसाठी नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम प्रणाली अंमलात आणली आहे. त्यामुळे आता रोहयोच्या सार्वजनिक कामांसाठी या सिस्टीमच्या अॅपवर मजुरांची दिवसातून दोन वेळा हजेरी घ्यावी लागणार आहे. अॅपवर मजुराची नोंद नसेल तर त्या कामाचे मस्टरही निघणार नाही. यासाठी मजुरांचे आधारलिंकही बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचे सांगितले जाते. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. या योजनेतून केवळ खिसे भरण्याचे काम अनेकांनी केल्यामुळे रोजगार हमी योजना बदनाम झाली. त्यामुळे घोटाळे पाहूनच आता केंद्र व राज्य सरकारने या योजनेत पारदर्शकता आणून शेतकरी, शेतमजूरांना आधार देण्याचे काम करत आहे.
जिल्हा तिसर्यांदा अव्वल
विशेष म्हणजे या योजनेची चांगल्यारित्या अंमलबजावणी होत आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे सलग तिसर्या वर्षीही ही योजना राबविण्यात जिल्हा राज्यात तिसर्यांदा अव्वल ठरला आहे.