देवरीत कलार समाजाचे संमेलन थाटात

देवरी,दि.९- देवरी तालुक्यातील सर्व वर्गीय कलार समाजाचे संमेलन काल रविवारी (दि.८) आमगाव रोडस्थित चौरागडे फार्म हाउस वर मोठ्या थाटात आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देवरी कलार समाजाचे अध्यक्ष डॉ. अनिल चौरागडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खुर्शिपार येथील पोलिसपाटील खेमराज देशमुख,देवरीचे माजी नगरसेवक यादवराव पंचमवार, बेरारटाईम्सचे सहसंपादक सुरेश भदाडे,नगरसेविका पिंकी कटकवार,देवरी नपचे सभापती संजय दरवडे, नगरसेवक नितीन मेश्राम, रुपराव बावनथडे, नेतराम बडवाईक, रचना उजवणे, सहस्त्रबाहू कलार समाजाचे सचिव रतिराम दरवडे, नुतन बंसोड, शोभा मेश्राम, माजी नगरसेवक प्रवीण दहिकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान सहस्त्रबाहू अर्जून यांच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी नवनिर्वाचित नगरपंचायतीचे नगरसेवक पिंकी कटकवार, नितीन मेश्राम आणि संजय दरवडे यांचा समाजाच्या वतीने मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय पुण्यदीप लिखिराम कवाडकर, वैष्णवी जागेश्वर ठवरे, वेदिका नितीन रणदीवे, सलोनी विजय दखने, हिताशी नितीन रणदीवे, रागिनी राधेश्याम देशमुख, साहिल राधेश्याम देशमुख आणि पारस सुरेश मेश्राम या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील मोमेंटो देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना बेरारटाईम्सचे सहसंपादक म्हणाले की, देवरी तालुक्यातील कलार समाज हा विखुरलेल्या स्वरुपात आहे. याला एकसंघ करण्याचे काम सहस्त्रबाहू समाजाच्या माध्यमातून करण्याचे कौतुकास्पद कार्य सुरू आहे. संघटन शक्तीला पर्याय नाही. कोणत्याही समाजाचा राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास हा समाज संघटनाच्या माध्यमातून तीव्र गतीने होत असतो. समाजातील दुर्बल घटकांचा स्तर उंचावण्यासाठी संघटन अत्यंत महत्वाचे साधन आहे. समाज संगठनाचे कार्याला अधिक गती देऊन शाखा-उपशाखेत विखुरलेल्या या समाजाला एकसंघ केले तर सरकार दरबारी सुद्धा आपली दखल घेतली जाणे शक्य आहे. यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष चौरागडे यांनी समाजातील अनेक समस्यांचा उहापोह केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रतिराम दरवडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश मेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार राधेश्याम देशमुख यांना मानले. यावेळी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share