बार हेडेड गुज’ पक्ष्याचे जिल्ह्यात पहिल्यादांच दर्शन

अर्जुनी मोरः निसर्गसौंदर्याची चौफेर उधडण असलेल्या तालुक्यातील काही तलावांवर थंडी पडताच देशी व विदेशी पक्ष्यांचे आगमन ही पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासकांसह पर्यटक व सर्वसामान्य नागरिकांसाठी पर्वणी ठरतो. यंदाही या तलावांवर देशीविदेशी पक्ष्यांचे मोठ्या संख्येने आमगन झाले असून ‘बार हेडेड गुज’चे जिल्ह्यात पहिल्यादांच दर्शन झाले आहे.

अर्जुनी मोरगाव तालुका हा तलावांचा तालुका म्हणून राज्यभर प्रख्यात आहे. तालुक्यात नवेगावबांध, बीडटोला, भुरशीटोला, शिरेगावबांधचा गंगेझरी तलाव, भिवखिडकीचा एरंडी तलाव, चान्ना, बाक्टी, बुटाईचा फुटका तलाव, गोठणगावचा गंधारी तलाव, बोंडगाव सुरबनचा शृंगारबांध तलाव, उमरपायली गवर्रा, माहूरकुडा आदी तलावात हे हिवाळ्यात विविध पक्ष्यांच्या खाद्यान्न व आवासासाठी पूरक आहेत. त्यामुळे या तलावांवर दरवर्षी या कालावधीत देशी व विदेशी पक्ष्यांची गर्दी पहायला मिळते. नोर्थन पिनटेल (तलवार बदक), रेड क्रेस्टेड पोचार्ड (मोठी लालसरी), कॉमन पोचार्ड (छोटी लालसरी), युरेशियन विजन (तरंग बदक), गडवाल (मलीन बदक), गार्गणी (भुवई बदक), लिटल ग्रेब (टिबुकली), लिटल रिंग प्लोवर (छोटी कंठेरी चिखल्या), रंगीत पानलावा, ग्रे हेरॉन (राखी बगडा), कॉमन टील (चक्रांग बदक), कोंब डक (नाकेर) आदी विविध रंगाच्या, आकाराच्या पक्ष्यांनी सध्या हजेरी लावली आहे. हे विविध प्रजातीचे पक्षी दरवर्षी या भागामध्ये हजारो किलोमीटरचे अंतर पार करून आलेले हे पक्षी थंडीचे प्रमाण कमी झाल्यानंतर परतीच्या प्रवास करतील. युरोप आशिया खंडाच्या वरच्या भागात कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली की तिथल्या थंडगार आणि बर्फाळ प्रदेशात या पक्षांना मुबलक अन्न मिळत नाही. तिथल्या तुलनेत इकडे थंडीचे प्रमाण कमी असल्याने कित्येक अंतर पार करून अन्न मिळविण्याकरिता हे पक्षी येत असल्याचे डॉ.प्रा. शरद मेश्राम यांनी सांगितले आहे.

अभ्यासकांकडून पक्षी निरिक्षण

पक्षीप्रेमी व अभ्यासकांकडून शृंगारबांध, गंधारी तलाव, बुटाई तलाव आदी तलावांवर रविवार, 25 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणात प्रे लेग गुज, रेड क्रेस्टेड पोचार्ड, युरोशियन विजन,गडवाल,नॉर्थन पिनटेल , आदी स्थलांतरित पानपक्षी बहुसंख्येने आढळले. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच ‘बार हेडेड गुज’ या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. या निरिक्षणात डॉ. शरद मेश्राम, डॉ. गोपाल पालीवाल, रुपेश निंबार्ते, भीमराव लाडे, किशोर भोंडे, किशोर चांदेवार, छत्रपाल चौधरी, आशिष दुबे, वसंत केवट, सचिन देशकर, सिरीस धारगावे, प्रा. अजय राऊत यांनी सहभाग नोंदविला.

Print Friendly, PDF & Email
Share