ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीची रंगत वाढणार

गोंदिया: जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रक्रियेतंर्गत 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. आज, 30 नोव्हेंबर रोजी तिसर्‍या दिवशी एकूण 516 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सरपंचपदासाठी 93 तर सदस्यपदासाठी 423 उमेदवारी अर्ज दाखल झाला. तीन दिवसात उमेदवारी अर्जाची संख्या बघता आता निवडणुकीच्या रणधुमाळीची रंगत वाढणार असल्याचे दिसत आहे.

ग्रामविकासाची मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी या अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींसह विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाची ठरते. ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी समर्थित पॅनलच्या नावाखाली अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षाद्वारे लढविल्या जातात. राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या काळात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आला आहे. यातंर्गत जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतीच्या निवडण्ाुक होऊ घातलेल्या आहेत. एक महिन्यापासून सर्वच राजकीय पक्षाचे इच्छूक पक्ष आपल्यालाच पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी नेते, पदाधिकार्‍यांचे उंबरठे झिजवित असलेल्याचे चित्र होते. तर इच्छूकांची संख्या मोठी असल्याने नेते व पदाधिकार्‍यांनी विजयी ठरु शकणार्‍या उमेदवाराची निवड करण्यात दमछाक होत असल्याची चर्चा होती.

दरम्यान, 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज, 30 नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसात 516 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात (Gram Panchayat) सरपंचपदासाठी 93 तर सदस्यपदासाठी 423 उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी 4 अर्ज, दुसर्‍या दिवशी 64 अर्ज तर तिसर्‍या दिवशी 444 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. तिसर्‍या दिवशी वाढलेल्या अर्जाची संख्या पाहता आता खर्‍या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकीची जिल्हावासींयाना चूरस पाहायला मिळणार आहे. तर राजकीय पक्षांना आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share