विद्युत तारेच्या स्पर्शाने सारस जोडप्याचा मृत्यू

गोंदिया: गोंदिया तालुक्यातील कामठा येथील आश्रमशाळेच्या पसिरात एका सारस जोडप्याचा (Stork couple) विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 22 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. हे सारस पक्षाचे जोडपे 5 वर्षाचे होते.

दुर्मिळ असे सारस पक्षी जिल्ह्याची ओळख आहे. सारस संवर्धनासाठी प्रशासनासह सेवा संस्थेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे जिल्ह्यात सारस पक्षी संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कुठेतरी प्रशासन सारस संवर्धनाकडे दुर्लक्ष करतो की काय? असे म्हणण्याची वेळ सारस पक्ष्याच्या अपघाती मृत्यूने आली आहे.

सारस पक्ष्यांची संख्या असलेल्या शेत परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत तारांचे जाळे असल्याने त्या तारांना स्पर्श होऊन पक्ष्यांचा मृत्यू होऊ लागले आहेत. अशात मंगळवारी विद्युत ताराच्या स्पर्शाने सारस जोडप्याचा (Stork couple) मृत्यू झाल्याची घटना समोर आली. 5 ते 7 दिवसापूर्वीच या सारस जोडप्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सारसचे हे जोडपे 5 वर्षाचे असून नर पक्ष्याची लांबी 5 फूट 8 इंच व मादा पक्ष्याची लांबी 5 फूट व 4 इंच आहे. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी उत्तरीय तपासणी केल्यावर मृत जोडप्याला वन अधिकारी व सारस प्रेमींच्या उपस्थितीत जाळण्यात आले. 

आता सारसांची संख्या 32

आजच्या या घटनेने 2022 मध्ये जिल्ह्यात असलेली 34 सारस पक्ष्यांची संख्या आता 32 वर आली आहे. मागील 3 वर्षात दासगाव येथे 2, परसवाडा 1 व पांजरा येथे 1 सारस पक्ष्याचा मृत्यू झालेला होता. मंगळवारी परत 2 सारस पक्ष्यांचा मृत्यू झाला.

सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सारस जोडप्यांचे (Stork couple) वास्तव्य असलेल्या परिसरात विद्युत तारांना आवरण घालने किंवा केबलचा वापर करणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव संवर्धन आराखड्यात सादर करण्यात आला आहे. मात्र यासाठी मोठ्या निधीची गरज असून प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. सारस संवर्धनात अशा अपघाती घटनेमुळे अडचणी येत असल्याचे मत सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी व्यक्त केले.

Print Friendly, PDF & Email
Share