पोलिओ लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी मीना


17 जानेवारीला पोलिओ लसीकरण


गोंदिया,दि.29 : येत्या 17 जानेवारीला जिल्ह्यात 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओचा डोज देण्यात येणार आहे. पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी पोलिओ लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करा. असे आवाहन जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना यांनी केले आहे.
पोलिओ लसीकरणाच्या जिल्हास्तरीय समितीची सभा 28 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री मीना बोलत होते.
सभेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.संजय पांचाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील व सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील 1,09,856 लाभार्थ्यांना पोलिओ डोज दिला जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 92661 तर शहरी भागातील 17195 लाभार्थी असणार आहेत. यासाठी 1 लक्ष 39 हजार आवश्यक पोलिओ लस उपलब्ध झालेली आहे. ग्रामीण-1289 तर शहरी-119 अशा एकूण 1408 लसीकरण बुथवर पोलिओचे डोज दिले जाणार आहे. या मोहिमेमध्ये बायव्हायलंट लसीचा वापर करण्यात येणार आहे. मोहिमेच्या दिवशी बुथवर व त्यानंतर सुटलेल्या लाभार्थ्यांना घरभेटीद्वारे ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, टोलनाके, विमानतळ येथे लाभार्थ्यांचे प्रवासाच्या दरम्यान ये-जा असते अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार ट्रांझिट टिमचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 82 टीम काम करणार असून ग्रामीण भागात 51 तर शहरी भागात 31 टीम राहतील. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Print Friendly, PDF & Email
Share