सी-६० कमांडोच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या : अहेरी येथील खळबळजनक घटना

प्रतिनिधी / गडचिरोली : येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात कार्यरत असलेल्या आणि नक्षलविरोधी अभियान पथकात असलेल्या सी-६० कमांडोच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी दुपारी अहेरी येथे घडली. उषा तुकाराम गिते २३ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सी-६० कमांडो असलेले तुकाराम गिते येथील हॉकी ग्राउंडजवळ किरायाच्या घरात त्यांचे राहत होते. एक महिन्यापूर्वी ते प्रशिक्षणावर गेले होते. काही दिवसांपूर्वीच ते प्रशिक्षणावरून परतून प्राणहिता उपमुख्यालयात रुजू झाले होते.
दरम्यान, रविवारी पती घरी नसताना उषा यांनी दाराची कडी आतून लावली आणि दीड वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीसमोर गळफास घेतला. कडी वरून लावलेली असल्याने मुलांना दार उघडता आली नाही आणि काही वेळातच त्यांच्या आईने जगाचा निरोप घेतला. उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.
अडीच वर्षांची मुलगी खिडकीत येऊन आई लटकली, असे म्हणून ओरडू लागली. त्यामुळे शेजारचे धावून आले. मात्र, त्यांना आतून लावलेली दाराची कडी उघडता आली नाही. शेजाऱ्यांनी लगेच पतीला याची माहिती दिली. त्यांनी लगेच घराकडे धाव घेऊन दार उघडल्यानंतर फासावर लटकलेल्या उषा गिते यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तुकाराम गिते हे नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असल्याने उषा यांचा मृतदेह नांदेड जिल्ह्यात नेण्यात आला. आईच्या आत्महत्येमुळे दोन लहान मुले पोरकी झाली आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share