Online शिक्षणापेक्षा देशी दारू दुकानाचा परवाना द्या विद्यार्थ्यांचे मंत्र्याला पत्र

नांदेड: Online education घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर, त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात शिक्षण घेत असणारा विद्यार्थी पवन जगडमवार याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. नांदेडच्या जिल्हाधिकार्‍यांमार्फत त्याने हे पत्र पाठवले आहे.

online education लादले जात आहे. वर्गात 40 विद्यार्थ्यांची संख्या असेल तर, आठ ते दहाच विद्यार्थी त्यात उपस्थित असतात. बाकी विद्यार्थ्यांकडे चांगले मोबाईल नाहीत, ग्रामीण भागात इंटरनेट सेवाही व्यवस्थित नाही, अनेक ठिकाणी नेटवर्क येत नाही, कधी लाईटच नसते. अशा स्थितीत शिक्षण कसे घ्यायचे, असा प्रश्न जगडमवार याने उपस्थित केला आहे. आभासी शिक्षणामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसानही होत आहे, याकडेही त्याने लक्ष वेधले.

कोरोना, ओमिक्रॉनचा प्रसार वाढत असल्याने राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. दारू दुकाने मात्र निर्धास्तपणे सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन ऑफलाइन शिक्षण घ्यायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आभासी शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना मिळावा, अशी मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.

राज्यात शिक्षणापेक्षा दारूला जास्त महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आभासी शिक्षण online education शिकून तरी काय फायदा, कारण त्यात प्रात्यक्षिक ज्ञान मिळत नाही. अशा शिक्षणापेक्षा दारूचा परवाना मिळाल्यास उपाशी मरणार नाही, असे या विद्यार्थ्याने पत्रात म्हटले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share