मध्यप्रदेश आणि छत्तीसगडतून येणाऱ्यांची कोरोना चाचणी केल्यानंतरच महाराष्ट्रात प्रवेश ….

गोंदियाला जिल्हाला लागून असलेल्या छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची प्राथमिक कोरोना चाचणी केल्यावरच त्यांना राज्यात प्रवेश दिला जात आहे. मात्र ट्रक आणि बस चालकांची कोरोना चाचणी न होता केवळ खासगी वाहने व मोटरसायकलीवरून येणाऱ्यांची चाचणी होत असल्याचे दिसत आहे.

देवरी २८- कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता राज्य सरकारने गोवा, राजस्थान, दिल्ली आणि गुजरात या राज्यातून येणाऱ्या लोकांचा कोरोना अहवाल पाहिल्यानंतरच त्यांना राज्यात प्रवेश देण्यात यावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या होत्या तसेच आता गोंदियातील जिल्हाधिकारी यांनी देखील छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची प्राथमिक कोरोना चाचणी केल्यावरच प्रवेश द्यायला सुरवात केली आहे. या ठिकाणी छोट्या गाड्या व मोटारसायकल वरून येणाऱ्यांना कोरोना तपासणी अहवाल बघितल्यावरच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिले जात आहेत. मात्र या तपासणीमध्ये ट्रक आणि बस चालकांची कोरोना चाचणी करताना दिसत नाही.

ट्रक व बसमधील प्रवाशांची कोरोना चाचणी का नाही – गोंदिया जिल्ह्याला लागून मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याची सीमा आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून मोठ्या संख्येत दर दिवशी हजारो लोक प्रवास करीत असतात. तर देवरी तालुक्याला लागून छत्तीसगड राज्याची सीमा असल्याने या ठिकाणी असलेल्या शिरपूर टोल नाक्यावर छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या लोकांची थर्मल तपासणी करून जर कोरोनाची लक्षणे नसतील तर त्यांना सोडण्यात येत आहे. तर ज्या लोकांना ताप किंवा कोरोना सदृश्य लक्षणे असतील. अशा लोकांना परत त्यांच्या राज्यात पाठविले जात आहे. नागरिकांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र ट्रक आणि बसमधून प्रवास करीत असलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे ट्रक चालकांना आणि खासगी बस चालकांना कोरोना चाचणीतून सूट दिली का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट उद्भवू शकते अशी शक्यता आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली होती. मात्र जर महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातून ट्रक आणि बस चालकांना सूट दिली तर महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा मोठा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Print Friendly, PDF & Email
Share