राज्य सरकार देणार दिवाळी भेट… आणखी शिथिल होणार निर्बंध?

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण होत असल्यामुळे दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्व प्रकारची दुकाने, उपाहारगृहे, मॉलच्या वेळमर्यादेत वाढ करण्यात येणार असून, याबाबतचा आदेश एक-दोन दिवसांत प्रसृत करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व व्यापारी दुकाने, बार, उपाहारगृहे, मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सध्या परवानगी आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के एवढ्याच ग्राहकांना उपाहारगृहांमध्ये प्रवेशास मुभा आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी व्यापारी तसेच उपाहारगृहांच्या मालकांकडून करण्यात येत आहे. सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये, चित्रपट तसेच नाटय़गृहे खुली करण्यास परवानगी दिली आहे. दिवाळीपर्यंत खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता दुकाने, मॉलच्या वेळेतही वाढ करण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचारविनिमय झाला. या पार्श्वभूमीवर दुकाने, उपाहारगृहे, मॉलवरील निर्बंध आता मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बंद सभागृहातील २०० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा आता उठविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता लसीची एक मात्रा घेतलेल्यांना आणि आरोग्यसेतू अ‍ॅपवर आरोग्य स्थिती चांगली असलेल्यांना मॉलमध्ये जाण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

Print Friendly, PDF & Email
Share