इंधन दरवाढीचा भडका सुरूच; दोन दिवस विश्रांती दिल्यानंतर पुन्हा दरवाढ

नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वधारल्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात वाढ केली. सलग दोन दिवस विश्रांती देण्यात आल्यानंतर ही वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेल दरात झालेली वाढ प्रत्येकी 35 पैशांची आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 110.75 रुपयांवर गेले आहेत तर डिझेलचे दर 101.40 रुपयांवर गेले आहेत.

जगभरात सध्या इंधन आणि ऊर्जा संकट निर्माण झालेले आहे. याच्या परिणामी कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे. दुसरीकडे तेल उत्पादक राष्ट्रांची संघटना असलेल्या ओपेकने कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्यास नकार दिला आहे. यामुळे क्रूड ब्रेंट क्रूड तेलाचे प्रतिबॅरलचे दर 84 डॉलर्सवर पोहोचले आहेत.

दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु असल्याने तेल कंपन्यांना क्रूड तेलाची आयात करणे महाग पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातत्याने इंधन दरवाढ सुरु आहे. दिल्‍लीमध्ये आता पेट्रोलचे दर 104.79 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 93.52 रुपयांवर गेले आहेत. देशातील अन्य दोन महानगरांचा विचार केला तर चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 102.10 आणि 105.44 रुपयांवर गेले आहेत. तर डिझेलचे दर 97.93 आणि 96.63 रुपयांवर गेले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share