“दिलेला शब्द मोडत नाही ही शिवसेनेची खासियत आहे”

मुंबई 18: पाच वर्ष सरकार चालवण्याची कमिटमेंट आहे. शिवसेना नेहमी कमिटमेंट पाळणारी आहे. शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही. दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. खासकरून ठाकरे कुटुंबाची. आम्ही त्याच मार्गाने जात असतो. त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल, या भ्रमात कुणी राहू नये, असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

कुणाला पतंग उडवायचा असेल त्यांनी तो उडवत बसवावं. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहितीये. त्यामुळे पाच वर्षे सरकार चालणार. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कुणाला आनंद झाला असेल तर त्यांना तीन वर्ष त्या आनंदात राहू द्या. सरकारला कोणताही धोका नाही, अशी ग्वाहीही संजय राऊतांनी दिली.

युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली. आमचं चांगलं चाललंय. महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. काल उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथंच संपले, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलंय.

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एकत्र बसल्याने अडचण वाटण्याचं कारण नाही. ते दोघेही त्या भागातील मंत्री आहेत. दानवे आणि आम्हीही सोबत बसतो. राजकारणात कडवटपणा नसतो. उद्या फडणवीस भेटले तर त्यांच्याशी मी नक्कीच बोलेन. त्यांची ख्याली खुशाली विचारेन. उद्या मला त्यांच्या घरी जावंसं वाटलं तर मी त्यांच्याकडे जाईन. एकमेकांचं तोंडच पाहायचं नाही, एकमेकांशी बोलायचंच नाही, असं महाराष्ट्रातील राजकारण नाही. हे चालत नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्राला एक परंपरा आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं.

Print Friendly, PDF & Email
Share