बिबट्याने १५ शेळ्या केल्या फस्त : देसाईगंज तालुक्यातील घटना

देसाईगंज : तालुक्यातील रावणवाडी टोली येथील प्रभू नैताम यांच्या गोठयात बांधलेल्या १५ शेळया बिबट्याने फस्त केल्याची घटना काल १५ सप्टेंबर रोजी रात्रोच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे शेळी मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील रावणवाडी परिसरात बिबटयाचा वावर आहे. काल १५ सप्टेंबर रोजी गावातील प्रभू नैताम यांनी आपल्या शेळया गोठयात बांधल्या होत्या. दरम्यान रात्रोच्या सुमारास बिबटयाने गोठयात प्रवेश करत ११ शेळया जागीच ठार केल्या तर चार जंगलात पळवून नेल्या यात तीन बोकडांचा समावेश आहे. हा सर्व प्रकार सकाळच्या सुमारास लक्षात आला. मात्र आठ फुटांची भिंत ओलांडून गोठयातील चार शेळया बिबटयाने पळविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर एकाच वेळी १५ शेळया ठार केल्याने एकापेक्षा अधिक बिबटे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर घटनेची माहिती क्षेत्र सहायक कलवार कानकाटे यांना मिळताच रावणवाडीच्या वनरक्षक कांबळे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या घटनेत शेळी मालक प्रभू नैताम यांचे जवळपास लाखोचे नुकसान झाले असून वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून वन विभागाने बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share