साकीनाका बलात्कार प्रकरणातील ‘निर्भया’चा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : उपचारादरम्यान मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. महिलेला जखमी अवस्थेत उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या बलात्कार पीडितेची भेट घेतली असून तिच्या परिस्थितीविषयी माहिती दिली होती. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महापौर पेडणेकर यांनी या घटनेचा निषेधही व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या, या पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून अंतर्गत रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला असून तिच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाली आहे. तिची आतडीही बाहेर आलेली होती आणि जंतूसंसर्गही मोठ्या प्रमाणावर झाला होता. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले असून ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे. ती प्रचंड वेदनेत असून डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज सापडले असून त्यात आरोपी दिसत आहे. महापौर याबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या, आत्ता तिच्यासोबत फक्त तिची आई आहे आणि तिचे म्हणणे आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या आरोपीसोबत पीडितेचे गेल्या १२-१३ वर्षांपासून संबंध होते, ते दोघे एकमेकांशी परिचित होते. आसपासच्या लोकांनी जेव्हा फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितले की दोघांमध्ये काही भांडण सुरू होते. या प्रकरणाबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली होती. महापौर म्हणाल्या, आजकाल समाजातील पुरुषांमध्ये क्रूरता वाढताना दिसत आहे. ही क्रूरता का वाढत आहे?

Print Friendly, PDF & Email
Share