सावधान! गोंदिया जिल्ह्यात डेंग्यू,मलेरीया धोका वाढला

गोंदिया जिल्ह्यात मलेरीया, डेंग्यू पाय पसरवतोय. जिल्ह्यात आतापर्यंत मलेरीयाच्या 367 तर डेंग्यूच्या 121 रूग्णांची नोंद झाली असून दोन रुग्ण दगावले आहेत.

गोंदिया 03: गोंदिया जिल्ह्यात कोरोना पेक्षा डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले असून डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांत प्रचंड वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत मलेरियाच्या 367 तर डेंग्यूच्या 121 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन्ही आजाराच्या प्रत्येकी एका रुग्णाचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

वातावरणातील बदल आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. यात विशेष बाब अशी की गोंदिया जिल्ह्यात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यात आढळले आहे. हा भाग दुर्गम व जंगलव्याप्त असल्याने या भागात दरवर्षी मलेरियाच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद असते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असताना डेंग्यू आणि मलेरियाने डोके वर काढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा आढावा घेण्यासाठी आशा आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या परिसरात सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून गोंदिया जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.

डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूची लक्षणे ही सर्वसामान्य विषाणूसंसर्गाप्रमाणेच असतात. मात्र काही वेळा दोन-तीन दिवसांनी ताप उतरला की असह्य़ डोकेदुखी होऊ लागते, उलटय़ा होतात, अंग मोडून येते, सूज येते. डेंग्यूच्या तापामध्ये सांधे दुखतात, अंगावर चट्टेही उठतात.

प्रतिबंधात्मक उपाय
डासांची संख्या कमी करणे व त्यांना दूर ठेवणे हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. घरात व परिसरात पाणी साचू न देणे, फुलदाण्या, फेंगश्युईची रोपे, नारळाला कोंब यावा म्हणून ठेवलेले पाणी यातही डेंग्यूच्या अळ्या सापडतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करायला हवेत.

Print Friendly, PDF & Email
Share