जम्मू कश्मीर : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था / श्रीनगर : उत्तर कश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला असून चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली आहे.
सोपोर भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोधमाहीम हाती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर आणि त्याचा साथीदार एका घरात लपले होते. सुरक्षा दलाने कारवाई करत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके आढळली आहेत.
या घटनेनंतर सुरक्षा दलाने व्यापक स्तरावर शोधमोहीम हाती घेतली आहे. अजूनही या भागात चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या वर्षात सुरक्षा दलाने 86 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर जून जुलैमध्ये 36 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जुलै महिन्यात 20 दिवसात 10 चकमकी झाल्या असून त्यात 20 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर या घटनांमध्ये 15 जवान शहीद झाले असून 19 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share