Exclusive Talk on करवा चौथ- शरू निमजे

Mrs. Sharu H. Nimje (Social Worker)

आश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी पूर्ण दिवस उपवास करतात. संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चाळणीतून प्रथम चंद्राचे दर्शन व नंतर पतीचा चेहरा पाहतात. क्वचित अविवाहित स्त्रियाही आपल्या इच्छित पतीसाठी हे व्रत करतात. या दिवशी भगवान शंकर,देवी पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. त्याजोडीने दहा छोटे मातीचे घडे पाण्याने भरून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती आहे. या घड्यांना “करवा” असे म्हणतात.हे करवे नंतर आपल्या घरातील मुलींना आणि बहिणींना भेटवस्तूंसह दिले जातात. या दिवशी महिला एकत्र बसून या व्रताची कथा एकमेकींना सांगतात.काहीवेळा ब्राहण पुरोहित येऊन ही कथा सांगतात आणि त्याच्या मोबदल्यात पुरोहिताला दान दक्षिणा दिली जाते. विवाहित स्रियांना त्यांच्या पतीकडून भेटवस्तू दिली जाते. स्रिया आपल्या सासूचे आणि घरातील अन्य ज्येष्ठ स्रियांचे आशीर्वाद घेतात.

कथा : कोणे एके काळी एका नवविवाहित महिलेने आपल्या माहेरी असताना हे व्रत केले.ती सुस्वरूप अशी युवती होती.तिने कठोरपणे आपला उपवास पालन केला. तिच्या तपाने तिला दीर्घायुष्य मिळाले. भावांनी जवळच्या डोंगरावर अग्नी प्रज्वलित केला आणि तिला सांगितले की चंद्र उगवला आहे. व्रताची समाप्ती करताना चंद्राचे दर्शन घेण्यासाठी ती तिथे गेली पण तिला लक्षात आले की भावांनी आपल्याला फसविले आहे.तिचे व्रत मोडल्याने तिच्या पतीच्या निधनाची बातमी तिला समजली.ती बातमी कळताच ती आपल्या पतीच्या घरी निघाली.वाटेत तिला शिव पार्वती भेटले आणि त्यांनी तिला असे का घडले असावे हे कथन केले.पार्वतीने तिला आपल्या करंगळीच्या टोकातून थोडे रक्त दिले आणि आपल्या पतीच्या मुखावर शिंपडण्यास सांगितले.भविष्यकाळात तिने अगदी कठोरपणे हे व्रत पाळण्याचा सल्लाही देवीने तिला दिला. सासरी पोहोचल्यावर तिने पार्वतीने दिलेले रक्त पतीच्या मुखावर शिंपडले आणि तो पुनरूज्जीवित झाला.त्यानंतर या महिलेने निष्ठेने करवा चौथ व्रत पालन केले आणि तिला सुख समृृद्धी प्राप्त झाली अशी या व्रतामागील आख्यायिका आहे

Print Friendly, PDF & Email
Share