कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातील बेरोजगारीत दुप्पट वाढ

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. यामुळे काही राज्यांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊनही केलं आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय आणि नोकऱ्यांवर होताना दिसत आहेत. बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचंही दिसून आलं आहे. गेल्या आठवड्यात 16 मेपर्यंत बेरोजगारीचा दर हा तब्बल 14.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरातला हा उच्चांक आहे. खासगी थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार 9 मे रोजी आकडेवारी 8.67 टक्के इतकी होती. त्यात आता जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी बेरोजगारीने उच्चांक गाठला होता. हा उच्चांक तब्बल 21.73 टक्के इतका होता. त्यावेळी देश कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करत होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत यावर्षी एप्रिल महिना नोकऱ्यांच्या दृष्टीने खुपच वाईट ठरला. अनेक राज्यात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केल्यानं मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली. मार्च 2021 मध्ये बेरोजगारीचा दर जवळपास 6.5 टक्के इतका होता. एप्रिलमध्ये तो वाढून 7.97 टक्क्यांवर पोहोचला. 

CMIE च्या मते, लॉकडाऊनमुळे लोकांना काम मिळत नाही आणि यामुळे बेरोजगारीचा दर वाढला आहे. अर्थव्यवस्थेवरही मोठा ताण आहे त्यामुळे लोकांना रोजगार देण्याची परिस्थिती नाही. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात 1.85 कोटी जणांना मनरेगा अंतर्गत काम देण्यात आलं. जे 2019 च्या तुलनेत 52 टक्के इतकं जास्त आहे. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे, बेरोजगारीचे प्रमाण कृषी क्षेत्रात जास्त दिसत आहे. ज्यावर लॉकडाऊनचा परिणाम जाणवत नाही.

कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर देसात एप्रिल महिन्यात 75 लाखांहून अधिक जणांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर जास्त असून गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला असून 17.51 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share