मोहफुलाच्या दारुमध्ये होमिओपॅथी औषध मिसळून पिल्याने एकाच कुटुंबातील ८ तरुणांचा मृत्यू

विरेंद्र सोनी संवाददाता
रायपूर :
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील सिरगिट्टी येथे दारुमध्ये होमियोपॅथी औषध मिसळून पिणे एकाच कुटुंबातील ८ जणांच्या जीवावर बेतले आहे. अन्य ५ जण गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
वृत्तानुसार, हे तरुण गेल्या अनेक दिवसांपासून होमियोपॅथी औषध ‘ड्रोसेरा ३०’ कोरोनावर प्रभावी असल्याचे समजून मोहाच्या दारुसोबत पित होते. दारुसोबत हे औषध प्यायल्याने कोरोनापासून बचाव होता असा त्यांचा गैरसमज होता.
मंगळवारी सायंकाळी तरुणांनी मोहाच्या दारुसोबत होमियोपॅथी औषध घेतले आणि सर्व जण आपापल्या घरी निघून गेले. घरी गेल्यानंतर रात्री तरुणांची तब्येत बिघडली. सर्वांना उलट्या होऊ लागल्या. बुधवार सकाळपर्यंत चार तरुणांचा मृत्यू झाला. यानंतर चौघांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली, तर ५ तरुणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.


दरम्यान, बिलासपूरच्या सीएमओने या घटनेबाबत बोलताना सांगितले की, तरुणांचा होमियोपॅथी औषध दारुमध्ये मिसळून प्यायल्यानेच मृत्यू झाला. या तरुणांनी मोहाच्या दारुमध्ये ‘ड्रोसेरा 30’ नावाचे कफ सिरफ मिसळले होते. या औषधामध्ये 91 टक्के अल्कहोल असते.

Print Friendly, PDF & Email
Share