देवरी तालुक्यात वॅक्सिन संपली, गोंदिया जिल्ह्यात केवळ 50 वॅक्सिन

देवरी तालुक्यात कोरोना लस संपली, लॉकडाउन आणि कोरोनाच्या संकटात वॅक्सिन चा स्टॉक संपला

गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाउनसंबंधित आदेश काढला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मंगळवार, 6 एप्रिल रोजी सर्वत्र शटडाउन करण्यात आले आहे. त्यातच अत्यावश्यक सेवेतील दुकानांचे मालक व तेथील कर्मचारी यांनी शासनाने दिलेल्या निकषानुसार शक्य तितक्या लवकर कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आदेशात नमूद आहे. शिवाय 45 वयोगटावरील सर्वांना त्वरित लसीकरण करण्याचा सल्ला शासन-प्रशासनाकडून दिला जात आहे. पण जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी फक्त 350 व त्यानंतर रात्रीला केवळ 50 वॅक्सिनचे डोस उरले असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकार्‍यांनी दिली आहेत. आता वॅक्सिनचा जिल्ह्यातील साठा संपत आल्याने आणि नवीन साठा उपलब्ध न झाल्याने लसीकरण कसे होणार? अशी समस्या निर्माण झाली आहे.

संबंधित अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया ग्रामीण, आमगाव, तिरोडा, गोरेगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मरोगाव येथे शासकीय लसीकरण केंद्रे आहेत. तसेच गोंदिया व तिरोडा शहरातील न्यू गोंदिया हॉस्पिटल, गोंदिया केयर हॉस्पिटल (बाहेकर) राधाक्रिष्ण हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटल, ब्राम्हणकर हॉस्पिटल व धुर्वे हॉस्पिटल तिरोडा येथे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. या सर्व लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्या डोसचे 96480 व दुसर्‍या डोसचे 11496 असे एकूण 1 लाख 7 हजार 976 लसीकरण करण्यात आले. मात्र आता वॅक्सिनचे डोस संपत आल्याने लसीकरण केंद्रातील कर्मचारी नागरिकांना परत पाठवित असल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे.

शासन-प्रशासन एकीकडे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना समुपदेशन करून प्रवृत्त करीत आहे. तर दुसरीकडे वॅक्सिनचा स्टॉक संपला आहे. त्यामुळे लसीकरणासाठी गेलेल्या अनेकांना लस न देताच मंगळवारी परत पाठविण्यात आल्याने त्यांना मोठा त्रास, मनस्ताप झाला असून आर्थिक झळ सुद्धा पोहचली. शासनाने वॅक्सिनचा साठा त्वरित उपलब्ध करून दिल्यास पुन्हा लसीकरण मोहिमेला गती येईल अन्यथा कोरोनाची दहशत राहील. याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडे विचारणा केल्यावर त्यांनी 10 एप्रिल किंवा त्यापूर्वीच कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा साठा उपलब्ध होईल, असे सांगितले आहे.
मंगळवारी 1318 जणांना लसीकरण

गोंदिया जिल्ह्यात कोविशील्ड व कोवॅक्सिन असे दोन प्रकारचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. मंगळवार, 6 एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिल्या डोसचे 1108 व दुसर्‍या डोसचे 210 असे एकूण केवळ 1318 लसीकरण करण्यात आले. तर जिल्ह्यात आतापर्यंत 96480 जणांना पहिला डोस व 11496 जणांना दूसरा डोस देण्यात आला. असे एकूण 1 लाख 7 हजार 976 लसीकरण झाले आहे. मात्र आता वॅक्सिनचे डोस संपत आल्याने समस्या निर्माण झाली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share