नांदेडमधे पोलिसांवर हल्ला; सहा पोलिस गंभीर जखमी

प्रहार टाईम्स वृत्तसेवा

रंगपंचमी ची मिरवणूकीस परवानगी नाकारल्याने दगडफेक, पोलिसांच्या वाहनांची तोडफोड

कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाउन लागू केलेली असून सर्व धार्मिक कार्यक्रम करण्यालाही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याच कारणावरून होळी सणानिमित्त शीख समुदायाच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मिरवणुकीदरम्यान काही तरूणांनी नांदेड पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक केली असून यामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. गुरुद्वारा परिसरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सोमवारी हल्लाबोल मिरवणूक होळीनिमित्त काढण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांनी मिरवणूक काढू नये, सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने काळ कठीण आहे. त्यामुळे शीख समाजाने प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली होती. परंतु परवानगी नसतानाही हल्लाबोलची मिरवणूक काढली. संतप्त युवकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स तोडून टाकले, हातात नंग्या तलवारी घेऊन शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. शेवटी पोलिस प्रशासनाकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता चक्क त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. यात पोलीस अधीक्षकांचे अंगरक्षक दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा ते सात पोलिस गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात स्वत: एसपी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, वजिय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले बचावले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनीही भेट दिली. हल्लेखोरांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह वाहनांची प्रचंड नासधुस केली. पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share