सराईत गुन्हेगाराची थेट कारागृहात रवानगी
गोंदिया: विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधीकार्यांनी 14 डिसेंबर रोजी खून, जबरी चोरी, घरफोडी व दुखापत अशा 20 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुर्हेगाराची थेट कारागृहात रवानगी केली. शंकर उर्फ गुरु राजाराम पटले (25) रा.संजयनगर असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीवर खून, चोरी, घरफोडी, अश्लिल शिविगाळी, गुन्ह्यात हत्यार बाळगणे, दुखापततंर्गत शहर पोलिस ठाण्यात एकूण 12 गुन्हे नोंद असून तिरोडा पोलिस ठाण्यात घरफोडीचे 3 गुन्हे, गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात खून, जबरी चोरी, घरफोडी असे 3 गुन्हे आणि रामनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचे 2 गुन्हे अशा एकूण 20 गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपीने आपल्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणावी, या उद्देशाने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांनी आरोपीवर फौप्रसं कलम 110 प्रमाणे प्रतिवृत्त दाखल करुन प्रतिवृत्त चौकशीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी एस. बी. ताजणे यांच्या कार्यालयात पाठविले होते. मात्र, वेळोवेळी नोटीस, समंस, जमानती वारंट बजावून सुध्दा आरोपी हा पेशी तारखेवर येण्यास टाळाटाळ करीत होता. यावरुन आरोपी हा कायद्याला जुमानत नसल्याचे दिसून आल्याने व भविष्यात एखादा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने तसेच आगामी होणार्या ग्राम पंचायत निवडणुका शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पडावे या हेतूने आरोपीला 14 डिसेंबर रोजी अटक भंडारा कारागृहात पाठविण्यात आले आहे.