जिल्हा परिषद शाळांच्या 200 वर्ग खोल्या होणार भूईसपाट

गोंदिया: जिल्हा परिषदेच्या शाळेच्या अनेक वर्ग खोल्या जिर्ण अवस्थेत आहेत. मात्र प्रशासन अशा इमारतीकडे लक्ष देत नाही. परिणामी शाळेच्या भिंती जमीनदोस्त होवुन जीवित हानी नाकारता येत नाही. राज्यात अशा घटना घडून प्राण हानी झाली आहे. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी, संबंधित ग्रामपंचायतींना पत्र पाठवून सरकारी शाळांच्या मोडकळीस आलेल्या खोल्यांना पाडण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. आता गोंदिया जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्ह्यातील जि. प. शाळांच्या जर्जर असलेल्या वर्ग खोल्या पाडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. त्यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचे छत, भिंती जर्जर झाल्या आहेत. ज्या कधीही पडूू शकतात. ही वस्तूस्थिती असताना या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसविले जात आहे. अशावेळी कोणतीही दुर्घटना शंभवू शकते. शिक्षणाधिकारी व समग्र शिक्षा अभियान यांना जीर्ण खोल्या ग्रामपंचायतमार्फत पाडण्यात याव्यात. अशा सूचना समग्र शिक्षा अभियानाच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आल्या आहेत. जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये. त्यासाठी 4 कोटींचा निधी लागणार असल्याचे सांगीतले जाते. आवश्यक निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे. या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर जिर्ण वर्ग खोल्या पाडून नविन वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे समजते.

मोडकळीस आलेल्या 200 वर्ग खोलींचा अहवाल प्राप्त झाला आहे. या धोकादायक वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवले जात नाही. पंचायत समिती, गट शिक्षणाधिकारी, संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिर्ण वर्ग खोल्या पाडण्यात येणार आहेत. यासाठी 4 कोटींचा निधी लागणार असून निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचे समग्र शिक्षा विभागाचे अभियंता जीवनेश मिश्रा यांनी सांगीतले.

Share