आमगाव विधानसभेत ९ पैकी ७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

जिल्हात ६४ पैकी ५६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

देवरी: गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक पार पडली. चारही मतदार संघात एकूण ६४ उमेदवारांनी रिंगणात भाग्य आजमाविले. मतदान प्रक्रियेनंतर निकाल जाहिर झाला. दरम्यान बंडखोर व अपक्ष तसेच इतर पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला निवडणूक आयोगाने अनामत रक्कम गोठविण्यासाठी ठरविलेल्या निर्बंधाएवढे मत घेता आले नाही. सर्वच मतदार संघात प्रत्येकी प्रमुख दोन उमेदवार वगळता कोणत्याही उमेदवाराला तेवढी मते न मिळाल्याने डिपॉझिटही वाचविता आले नाही.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक उमेदवारावर अर्ज दाखल करीत असताना १० हजार रूपये अनामत रक्कम जमा करावी लागते. तरआरक्षित प्रवर्गासाठी ५० टक्के सुट देण्यात आली आहे. त्यानुरूप आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ५ हजार रूपये अनामत रक्कम भरावी लागते. गोंदिया व तिरोडा हे दोन मतदार संघ हे सर्वसाधारण होते. या मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्यांनी १० हजार रूपये डिपॉझिट केले.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व आमगाव हे दोन मतदार संघ अनुक्रमे अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती या दोन प्रवर्गासाठी आरक्षित होते. अर्जुनी मोरगाव विधानसभा सभा संघात १९ उमेदवार रिंगणात होते. तर आमगाव मतदार संघात ९ उमेदवारांनी निवडणूक लढविली. अर्जुनी मोरगाव मतदार संघात राजकुमार बडोले व दिलीप बन्सोड या दोन प्रमुख उमेदवारांमध्येच काट्याची टक्कर झाली. तर उर्वरित १७ उमेदवारांना आपले डिपॉझिट रक्कमही वाचविता आली नाही. तसेच आमगाव मतदार संघात संजय पुराम व राजकुमार पुराम या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत राहिली. तर उर्वरित ७ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही.

तिरोडा विधानसभा मतदार संघात एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. विजय रहांगडाले व रविकांत बोपचे या दोन्ही उमेदवारातच लढत पहावयास मिळाली. तर उर्वरित १९ उमेदवारांना आपली डिपॉझिटही वाचविता आले नाही. गोंदिया विधानसभा मतदार संघात १५ उमेदवारांनी भाग्य आजमाविले. विनोद अग्रवाल व गोपालदास अग्रवाल या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली. तर उर्वरित १३ उमेदवारांना आपले डिपॉझिट गमवावे लागले. विशेष म्हणजे, चारही मतदार संघातील अपक्ष, बंडखोर व तिसऱ्या आघाडीसह इतर पक्षाच्या उमेदवारांनी आपला कसलाही करिश्मा दाखविला नाही.

Share