शालेय सहलीच्या बसला अपघात एका मुलीचा जागीच मृत्यू
नागपूर : नागपुरातील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाल्याने एका विद्यार्थ्यीनीचा मृत्यू झाला, तर ४४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना वर्धा रोडवरील एम्समध्ये, सात विद्यार्थी निम्समध्ये तर एका विद्यार्थ्याला प्लेटिना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला.
काही विद्यार्थी गंभीर जखमी आहेत तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. किरकोळ जखमी असलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना भेटू दिले जात आहे. पालकांच्या मदतीसाठी एम्स व इतर रुग्णालयात मदत कक्ष निर्माण करण्यात आला आहे. या बस मध्ये ५२ विद्यार्थी, एक शिक्षक व एक केअर टेकर होते. शाळेतून पाच बसेस या विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी निघाल्या होत्या. पेंढरी गावाजवळ चार बसेस समोर निघून गेल्या तर शेवटच्या बसचा वळणावर असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती बस उलटली. एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा डोक्याला गंभीर जखम झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांची ही सहल आज वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे जात होती. घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली व तातडीने हिंगणा पोलीस पोहोचली व विद्यार्थ्यांना तीन रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले.