निस्तार हक्क बाधीत न करता सारस पक्षी संवर्धन करा :- रचनाताई गहाणे

अर्जुनी मोर. -निसर्गाच्या कुशीत वसलेला, जलसंपदा ,वनसंपदा , आणि खनिज संपत्तीने नटलेला व निसर्ग सौंदर्याची मुक्तपणे उधळण होत असलेला अर्जुनी मोरगाव तालुका विविध बाबीने परिपूर्ण आहे. मानवी चुकीच्या नियोजनामुळे तालुक्याचे सौंदर्य हरपत असले तरी निसर्ग मात्र ही भरपाई भरून काढत असतो, या तालुक्यात 0 ते 100 हेक्टर पर्यंत अनेक तलाव बोळ्या असून 300 हेक्टर पर्यंत मोठे तलाव आहेत. तर नवेगाव बांध, शिरेगावबांध, इटियाडोह धरण तथा शृंगारबांध तलाव हे या तालुक्याचे भूषण आहे. अशा या वैभव पूर्ण तालुक्यात निस्तार हक्क बाधित न करता सारस पक्ष्यांचे संवर्धन करा अशा आशयाचे निवेदन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना 8 ऑक्टोबर रोजी देण्यात आले.
जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील नवेगाव बांध जलाशय व परिसरात मच्छीमार व्यवसाय चालत असलेल्या छोट्या तलावांना सारस पक्षी संवर्धनासाठी शासनाच्या राखीव करण्याच्या भूमिकेला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था नवेगाव बांध सह अनेक गावातील संस्थानी विरोध दर्शविण्याचे ठराव पारित केले आहे. मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था नवेगाव बांध ही संस्था मच्छी व्यवसाय करून आपली उपजीविका चालविणाऱ्या बांधवांची संस्था असून मागील 350 वर्षापासून नवेगाव बांध जलासयावर पारंपारिक मच्छीमार व्यवसाय निरंतर करीत असते. व सदर सदस्यांकडून आज पर्यंत जलाशयात वावरणाऱ्या पशुपक्षी यांना कोणतीही इजा न करता मच्छिमार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. तसेच नवेगाव बांध परिसरातील मुंगली, चान्ना ( कोडका ),पांढरवाणी, जांभळी, येलोडी , रामपुरी ,पवनी धाबे ,रांजीटोला ,देवलगाव ,येरंडी,कान्होली ,कोहलगाव ,भुरशीटोला सावरटोला व उमरी येथील छोट्या तलावावर मच्छिमार करून मत्स्य व्यवसाय करीत आहेत. मच्छी व्यवसाय करण्या व्यतिरिक्त या परिसरात उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने मच्छी व्यवसाय मुख्य व्यवसाय आहे.
त्या अनुषंगाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात सारस पक्षी वास्तव्यास नाही. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी शासनाने सारस पक्षी संवर्धन अधिनियमाचे तरतुदी लागू करण्यात येऊ नये. अशी मागणी मत्स्य सहकारी संस्थेच्या निवेदनातून करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाच्या तरतुदी लागू केल्यास त्याचा मुख्य मच्छीमार व्यवसायावर गंभीर परिणाम होऊन परिसरातील पाच हजाराचे वर मच्छीमार कुटुंबावर उपासमारीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवेगाव बांध जलाशय व परिसरातील छोट्या तलावावर सारस पक्षी संवर्धनासाठी शासनाचे अधिनियम लागू करण्यात येऊ नये अशी मागणी ही जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदन जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांचे नेतृत्वात देण्यात आले आहे. यावेळी पंचायत समिती अर्जुनी मोर.चे उपसभापती होमराज पुस्तोळे, अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष भोजू लोगडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अण्णा पाटील डोंगरवार, कान्होली चे सरपंच संजय खरवडे, मत्स्य सहकारी संस्थांचे संजय भुमके, मोरेश्वर ठाकरे, देवेश कांबळे ,आनंदराव कांबळे, जितेंद्र कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

Share