गोंदियात आभाळ फाटले, जलमय झाला गोंदिया शहर

गोंदिया 21: शहरासह जिल्ह्यामध्ये मंगळवार 20 सप्टेंबर रोजी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे आभाळ फाटल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. सायंकाळी 8 वाजतापासून सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत सुरु होता. जिल्ह्यात 61.7 मिमी पावसाची तर गोंदिया तालुक्यात 132.7 मिमी विक्रमी नोंद झाली असून शहरात 22 वर्षीय युवक नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. तर गोंदिया शहर जलमय झाल्याने आज, 21 सप्टेंबर रोजी जनजीवन विस्कळीत झाले होते.

जिल्ह्यात मंगळवारच्या रात्री 8 वाजतापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लहानमोठ्या नाल्यांना पूर आलेला आहे. त्यातच गोंदिया शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले व नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. शहरातील राणी अंवतीबाई चौकात पुराचे पाणी 2-4 फुट रस्त्यावर असल्याने दुकानात पाणी शिरले. त्यातच रस्ता बांधकामामुळेही वाहनचालकांना रस्त्याच्या अंदाज येत नसल्यानेच ट्रक सुध्दा पलटला गेला आहे. कुडवा नाका परिसरात पाणी साचले आहे.

अंडरग्राऊंडमध्ये सुध्दा पाणी भरल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे. बायपास मार्गावर पाणी भरलेल्या खड्डयांचा अदांज न आल्याने प्रत्येकी एक ट्रक पलटला. शहर जलमय झाल्याने काही शाळांना आज सुट्टी देण्यात आली असून शहरातील अंतर्गत अनेक मार्ग बंद आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असल्याने याचा फटका ग्रामीण भागालाही बसला आहे. धान पीकासह भाजीपालाचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे. भारतीय ज्ञानदीप शाळेजवळून वाहणार्‍या नाल्यात रणजितसिंग प्रितमसिंह गील (22 रा. लोहिया वॉर्ड) दुचाकीसह वाहून गेला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने त्याचा शोध घेतला असता उशीरा रात्रीपर्यंत शोध लागला नव्हता. जिल्ह्यात 61.7 मिमी पावसाची नोंद झाली असून गोंदिया तालुक्यातील आठही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गोंदिया तालुक्यात 132.7 मिमी, आमगाव 50.5, तिरोडा 41.3, गोरेगाव 58.9, सालेकसा 46.8, देवरी 39.7, अर्जुनी मोर 43.1 व सडक अर्जुनी तालुक्यात 36.2 मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून पुजारीटोला धरणाचे 13 व शिरपूर धरणाचे 7 वक्रद्वार उघडण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज, 21 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजतापर्यंत विश्रांती घेतल्यावर पावसाला पुन्हा सुरवात झाली. 

गोंदिया तालुक्यातील मंडळनिहाय पाऊस

गोंदिया तालुक्यातील आठही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात गंगाझरी मंडळात 80.5 मिमी, रतनारा 131 मिमी, दासगाव 131 मिमी, रावणवाडी 137.3 मिमी, गोंदिया 125.3 मिमी, खमारी 198.8 मिमी, कामठा 86.5 मिमी व कुडवा मंडळात 171.3 मिमी पाऊस झाला.

Share