अनियमीत बसफेर्‍यांनी शालेय विद्यार्थ्यांचे बेहाल, शैक्षणिक तासिकांचे वाजले तीनतेरा

देवरी 20: तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठा धिंडोरा पिटत बस सेवा सुरु करण्यात आली परंतु सध्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या बेहाल कडे कुणाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातून देवरी शहरात विद्यार्थ्यांना शालेय वेळेत पोहचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेर्‍या चालविल्या जातात. मात्र त्या वेळेत पोहोचत नसल्याने शालेय तासिका बुडत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

देवरी शहरात प्राथमिक शिक्षणापासून ते उच्चशिक्षणापर्यंत विविध शाळा, महाविद्यालय आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावातील विद्यार्थी शहरात मोठ्या संख्येने येतात. शहरातील काही शाळांचे वर्ग सकाळपाळीत तर काही दुपारपाळीत चालतात. शहरात ये-जा करण्याकरिता राज्य परिवहन महामंडळातर्फे बसफेर्‍या चालविल्या जातात. मात्र त्या वेळेत पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना एक किंवा दोन तासिका बुडत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच परतीच्या प्रवासातही वेळेत बस येत नसल्याने घरी पोहोचण्यास सुद्धा सायंकाळी 6 ते 7 वाजतात. यासंदर्भात विद्यार्थी व पालकांनी महामंडळ व संबंधितांकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. सकाळ पाळीत 7.30 पूर्वी तसेच दुपार पाळीत 10.30 पूर्वी बसफेर्‍या चालविण्याची तसेच परतीच्या प्रवासात वेळापत्रकानुसार बसफेर्‍या सोडण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share