गोंदिया पोलिसांच्या 10 हजार कारवाया, वाहतूक नियम मोडणार्यांकडून 35 लाखांचा दंड वसूल
गोंदिया 20: जिल्हा वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर गत 8 महिन्यांत 10 हजार कारवाया करून तब्बल 34 लाख 86 हजार 850 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून स्वतःसह इतरांनाही अडचणीत आणतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनी 9 हजार 999 वाहनचालकांवर कारवाई केली. ज्यामध्ये रस्त्यावर वाहन उभे करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात बसविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, अतिरिक्त भार वाहून नेणे, सीट बेल्ट न बांधणे, वाहनांचे दस्ताऐवज न बाळगणे आदींचा समावेश आहे.
जानेवारीत 1396 प्रकरणांत 4 लाख 50 हजार 800 रुपये, फेब्रुवारीत 1671 प्रकरणांत 5 लाख 38 हजार 800 रुपये, मार्चमध्ये 1729 प्रकरणांत 6 लाख 1 हजार 250 रुपये, एप्रिलमध्ये 1274 प्रकरणांत 4 लाख 13 हजार 150 रुपये, मे मध्ये 1120 प्रकरणांत 4 लाख 16 हजार 350 रुपये, जूनमध्ये 919 प्रकरणांत 3 लाख 46 हजार 350 रुपये, जुलै महिन्यात 976 प्रकरणांत 3 लाख 61 हजार 900 रुपये आणि ऑगस्टमध्ये 914 प्रकरणांमध्ये 3 लाख 58 हजार 250 रुपये अशा एकूण 9 हजार 999 प्रकरणांत 34 लाख 86 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाई सुरूच राहणार : बनसोडे
वाहन चालवताना आवश्यक दस्तावेज बाळगणे आवश्यक आहे. वेग मर्यादा पाळावी, शाळा व महाविद्यालय मार्गावर खबरदारीने वाहन चालवावे, वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे न करणार्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले.