मुल्ला येथे सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू

देवरी: तालुक्यातील मुल्ला येथे शेतात काम करीत असलेल्या एका शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी (दि.8) सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव तुरसा जयेंद्र कुथीर (वय 40) रा. मुल्ला असे आहे.

सविस्तर असे की, मृत महिला ही आपल्या कुटुंबियासमवेत शेतात मशागतीचे काम करीत असताना एका विषारी सापाने चावा घेतला. ही बाब पती जयेंद्रच्या लक्षात आल्याने मृत तुरसाला मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केद्रात नेण्यात आले. या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने तिच्यावर तात्पुरता उपचार करून सुमारे दीड तासाने तिला देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले. वेळेवर योग्य उपचार रुग्णाला मिळू शकला असता तर तुरसाचा जीव वाचविता आला असता, अशी माहिती मुल्लाचे सरपंच कृपासागर गौपाले यांनी दिली .

Print Friendly, PDF & Email
Share