पोषण आहार शिजविणार्‍या महिलांचे आर्थिक संकटात!

◼️थकीत मानधनासंदर्भात पाठपुरावा करणार: महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम

गोंदिया : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माध्यान्न भोजनाचा पोषण आहार शिजविणार्‍या महिलांचे दोन महिन्यांचे मानधनच मिळाले नसल्याने या महिलांना आर्थिक विवांचनेला सामोरे जावे लागत आहे. पोषण आहाराद्वारे विद्यार्थ्यांचे कुपोषण थांबविणार्‍या या मदतनीस महिलांचे मात्र शासन जनू आर्थिक कुपोषण करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण आहार शिजविणार्‍या महिला मदतनिसांची जिल्ह्यात 2400 संख्या आहे. या मदतनीस महिलांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागते. दरमहाच्या अनुज्ञेय मानधनात केंद्र सरकार 600 रुपये आणि राज्य सरकार 900 रुपये मिळून 1500 रुपये मानधन देते. इतक्या तुटपुंज्या मानधनात काम करूनही ते वेळेत मिळत नाही. जुलै, ऑगस्ट महिन्यांचे 72 लाख रुपयांचे मानधन प्रलंबित आहे. मदतनिसांना एप्रिल 2022 पर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे. 27 जून रोजी नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. जुलैपासून या महिला शालेय पोषण आहार शिजवत आहेत, मात्र शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले नसल्याने त्यांचे मानधन रखडले असल्याचे जिपच्या शिक्षण विभागातर्फे सांगितले जाते. महाराष्ट्र राज्य संचालकांकडे अनुदानाची मागणी करूनही अनुदान प्राप्त होत नसून संचालनालय स्तरावरून अनुदान रक्कम उपलब्ध होताच मदतनिसांचे अनुदान देण्यात येईल, असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

केंद्र आणि राज्य शासन दरमहा शिक्षण विभागाच्या वेतनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र सहा ते सात तास राबणार्‍या मदतनीस महिलांना न्याय मिळत नाही. मदतनीस म्हणून ज्या महिला काम करतात, त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. प्रतिदिन 50 रुपये इतक्या अल्प वेतनात कुणीही काम करणार नाही. पोषण आहाराद्वारे मुलांचे शारीरिक पोषण व्हावे म्हणून या महिला मदतनीस सकाळपासून ते दुपारपर्यंत कार्यरत असतात. इंधनाच्याही अडचणी आल्या, तर लाकडी जळणावर त्या आहार शिजवून देतात. या मदतनीस महिलांची काळजी शिक्षण विभागाने करायला हवी. त्यांना आतापर्यंतचे मानधन त्वरित वितरीत करावे, अन्यथा याबाबद पाठपुरावा करून अशा महिलांच्या व्यथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे आपण मांडणार असून त्यांच्या थकीत मानधनासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share