देवरी : 10 हजाराची लाच स्विकारतांना ग्रामसेवक एसीबी च्या जाळ्यात

देवरी 03: बंडु मारोतराव कैलुके, पद ग्रामसेवक, ग्रामपंचायत कडीकसा, इस्तारी ता.देवरी जि. गोंदिया यांना रु.१०,००० /- लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदार हे ठेकेदारीचा व्यवसाय करीत असुन त्यांचे मामा हे बांधकाम ठेकेदार असुन ट्रेडर्स एन्ड कंट्रक्शन चे काम करतात तक्रारदार यांचे मामा यांना गट ग्रामंपचायत कडीकसा अंतर्गत येणाऱ्या ग्राम कडीकसा व गणुटोला येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प गोंदिया अंतर्गत जल जिवन मिशन वैयक्तीक नळ कनेक्शन व पाईप लाईन विस्तारी करणाचे काम प्राप्त झाले होते. त्यांनी तक्रारदार यांना करारनामा करुन गट ग्रामपंचायत कडीकसा अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांचेकडुन प्राप्त वरील काम करण्याचे अधिकार दिले आहेत.

सदर दोन्ही गावातील नळ कनेक्शन व पाईप लाईन विस्तारी करणाचे काम सुरु असुन दोन्ही गावातील पहिल्या टप्यातील काम पुर्ण झाले आहेत. कडीकसा गावातील पहिल्या टप्यातील झालेल्या कामाचे रनींग बिल जवळपास ३,७२,०००/- रुपये तक्रारदार यांना मिळाले आहे. ग्राम गणुटोला येथील पहील्या टप्यातील काम पुर्ण झाले असुन त्याचे जवळपास २,४५०००/- रुपये रनींग बिल ग्रामपंचायतला टाकले असुन ते बिल मंजुर झाले आहेत सदर रक्कमेचा चेक ग्रामपंचायत कडुन घेणे बाकी आहे. तक्रारदार सदर चेक बाबत विचारणा करण्याकरीता दि. ३०.०८.२०२२ ला ग्रामपंचायत कडीकसा येथे गेले असता तेथील ग्रामसेवक बंडु कैलुके यांनी तक्रारदार यांना कडीकसा येथे केलेल्या कामाचे बिल मंजूर करुन दिल्याचे मोबदल्यात व मौजा गणुटोला येथील मंजुर असलेले देयक देण्याकरीता अशा दोन्ही बिलाचे मिळुन जवळपास रु.६,००,०००/ रक्कमेवर ३% प्रमाणे रु.१८,०००/- दयावे लागतील तरच मी तुम्हाला मौजा गणुटोला येथील मंजुर असलेला चेक देईन असे म्हणुन तक्रारदार यांना रु. १८,०००/- लाच रक्कमेची मागणी केली त्यावेळी तक्रारदाराने त्यांना नाईलाजाने होकार दिला. तक्रारदारास गै. अ. श्री. बंडु मारोतराव कैलुके, पद-ग्रामसेवक, ग्रामपंचायत कडीकसा, ईस्तारी ता. देवरी, जि. गोंदिया यांना लाच रक्कम रु. १८,०००/- देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी गै.अ विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता दि. ०२.०९.२०२२ रोजी ला.प्र.वि. गोंदिया येथे तक्रार नोंदविली.

प्रस्तुत प्रकरणी दि. ०२.०९.२०२२ रोजी गै.अ. बंडु मारोतराव कैलुके, यांची तक्रारदाराकडे असलेल्या लाच मागणीच्या योग्य पडताळणी केल्यानंतर गै.अ. यांचे विरूध्द पंचायत समिती देवरी कार्यालयाचे मुख्य गेट जवळ, लाचेचा यशस्वी सापळा रचण्यात आला. सदर सापळा कार्यवाही दरम्यान बंडु मारोतराव कैलुके, पद-ग्रामसेवक, ग्रामपंचायत कडीकसा, ईस्तारी ता. देवरी, जि. गोंदिया (वर्ग-३) यांनी तक्रारदारास कडीकसा येथे केलेल्या कामाचे बिल मंजूर करुन त्याचे मोबदल्यात व मौजा गणुटोला येथील मंजुर असलेले देयक देण्याकरीता अशा दोन्ही बिलाचे मिळुन जवळपास रु.६,००,०००/- रक्कमेवर ३% प्रमाणे रु. १८,०००/- लाचेची मागणी करुन तडजोडीअंती रू.१०,०००/- लाच रकमेची पंचासमक्ष मागणी करून ती लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध्द पो.स्टे. देवरी जि. गोंदिया येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, श्री मधुकर गिते, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, श्री. पुरुषोत्तम अहेकर, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. गोंदिया यांचे मार्गदर्शनात पोनि. अतुल तवाडे, स.फौ. विजय खोब्रागडे, पो.हवा मिलीकीराम पटले, ना.पो.शि. राजेंद्र बिसेन, संतोष शेंडे, संतोष बोपचे, मंगेश काहालकर, चालक दिपक बाटबर्वे सर्व लाप्रवि, गोंदिया यांनी केली.

नागरिकांना आव्हान करण्यात येते की, त्यांची लोकसेवका विरुध्द तक्रार असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे संपर्क करावा.

Share