देवरी- आमगाव मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले , बांधकाम विभागाचे दुर्लक्षमुळे अपघाताची मालिका सुरुच!

◼️लोकप्रतिनिधी गप्प का ? सवाल जनतेचा

प्रहार टाईम्स
देवरी29 : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नसल्याने या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. असे असले तरी संबंधित विभागाने याची अद्यापही दखल घेतली नसल्याणे खड्ड्यांची समस्या कायम आहे.

देवरी तालुक्यातून जाणारा महामार्ग क्रमांक 543 वरील हजारो खड्डे नागरिकांच्या जिवावर बेतले आहे, राष्ट्रीय महामार्गाची अवस्था ग्रामीण स्त्यासारखी झाली असताना, साधे दुरुस्ती करण्याचे प्रयत्नही करण्यात आले नाही. यामुळे अपघाताची श्रृंखला सुरू झाली असून देवरी आमगाव या महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या खड्यांमुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावी लागत आहेत. खड्ड्यातून एक चाक निघाला की,दुसरा खड्डा तयारच असण्याचा अनुभव वाहन चालक घेत आहेत. विशेष म्हणजे देवरी ते आमगाव या महामार्गावरून अनेक पुढारी लोकप्रतिनिधी ये जा करतात, मात्र, त्यांनाही खड्यांचा त्रास होत असला तरी कोणीही यावर आवाज उठवत नसल्याने लोक प्रतिनिधी याबाबत गप्प का? असा संताप सवाल नागरिक करीत आहेत. वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष न दिल्यास तीव्र आन्दोलनाचा इशारा ही देण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share