बीड जिल्ह्यातील दोघांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

◼️आष्टी, गेवराई तालुक्यातील दोन शिक्षकांचा समावेश

◼️५ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार सन्मान

आष्टी:-आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुखद धक्का पहावयास मिळाला. आष्टी आणि गेवराई येथील शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शिक्षकांना पुरस्कार जाहीर केला जातो. बीडला पाच वर्षानंतर दोन शिक्षकांना पुरस्कार घोषीत झाल्याने जिल्हाभरातील शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. ५ सप्टेंबर रोजी दोन्ही शिक्षकांना दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आजचा सूर्य आशेचा किरण घेऊन उगवल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे. आष्टी आणि गेवराई तालुक्यात विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणार्‍या दोन शिक्षकांना सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिल्यानंतर जिल्हा पुन्हा एकदा या बातमीने उजळून निघाला.

गेवराईचे शशीकांत संभाजीराव कुलथे आणि आष्टीचे सोमनाथ वाळके या दोन शिक्षकांना सदरचा पुरस्कार जाहीर झाला असून ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते या पुरस्काराने दोन्ही शिक्षकांना सन्मानीत करण्यात येणार आहे. ज्ञानदानात सर्वोत्कृष्ट कार्य बीड जिल्ह्यातच होते हे पुन्हा एकदा या पुरस्काराच्या घटनेने दिसून आले आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या अनुषंगाने देशभरातील शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणार्‍या शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार दिला जातो. यावर्षी बीड जिल्ह्यातील दोन गुरुजी या पुरस्कारास प्रात्र झाले आहेत. यामध्ये आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात मुलांना काय हवं, त्यांचा ज्ञानार्जन कसं असावं, याचा शोध अन् बोधयुक्त कर्म वाळकेंनी वेळोवेळी केले.

शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक आशयाचे ज्ञान वाळके यांनी शिक्षण पद्धतीमध्ये अवलंब करत मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढावी यासाठी संगणक, प्रोजेक्टर, व्हिडिओ रेकॉर्डींग आदी साहित्याचा वापर करून लोकसहभागाला चालना दिली. लोकसहभागातून १५ लाख रुपयांची आर्थिक मदत उभारत डिजिटल शाळा उभी करून त्या शाळेत चित्राच्या स्वरुपात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची भूक भागवताना चित्ररुपी ज्ञानाचे पोषक खाद्य वाळकेंनी दिले तर दुसरे गेवराई तालुक्यातील शशीकांत कुलथे हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दामूनाईक तांडा येथे कार्यरत असताना तांड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून आजच्या युगाबरोबर नेताना समाज सहभागातून ई लर्निंग शाळा उभारत डिजिटल साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. 

मराठी विश्‍वकोष, संगीतकला विहार, एआय नेट, लेखन सहभाग, तथा साठहून अधिक आकाशवाणी कार्यक्रम घेत येथील विद्यार्थ्यांबरोबर अन्य विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसोबत उर्दू पदविका आणि गोरमाटी भाषेचा अभ्यास असलेले हे शिक्षक शशीकांत कुलथे यांना आतापर्यंत चार राष्ट्रीय, राज्य पातळीवरील ११, विभागस्तरावर २, जिल्हास्तरावर २१, तालुकास्तरावर १, केंद्रस्तरावर १, गावस्तरावर २ असे एकूण ४२ पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार घोषीत झाल्याने त्यांच्या कामाची ही सर्वोत्कृष्ट पावती मानली जातेय. या दोघांनाही राष्ट्रपती पुरस्कार ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share