नागपूर मनपाचा कर निरीक्षक लाच स्वीकारतांना अडकला एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधी / नागपूर : महानगर पालिकेच्या कर निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. त्याने घराचे कर कमी करण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. काझी फिरोजुद्दिन काझी निसारुद्दीन (३५) असे अटकेतील कर निरीक्षकाचे नाव आहे. तो मनपाच्या नेहरूनगर झोनमध्ये करनिरीक्षक आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्त्याच्या पत्नीच्या नावे एक भूखंड आहे. त्याचा दीर्घ कालावधीपासून मालमत्ता कर थकीत होता. तक्रारकर्ते नेहरूनगर झोन कार्यालयात गेले असता फिरोजने त्यांना मोठी रक्कम थकीत असल्याची माहिती दिली. तक्रारकर्त्याने कर कमी करण्याची विनंती केली असता फिरोजने नकार दिला.
मात्र नंतर कर कमी करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्याने प्रकरणाची तक्रार एसीबीचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली. ओला यांनी आपल्या पथकाला तक्रारीची पडताळणी करून कारवाईचे आदेश दिले. पडताळणीत फिरोजने पैशांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी त्याला पकडण्यासाठी मनपा कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारकर्त्याने फिरोजची भेट घेतली. फिरोजने त्यांच्याकडून पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली.
कारवाईदरम्यान फिरोजने प्रकृती बिघडल्याचे पथकाला सांगितले. छातीत दुखत असल्याचे सांगितल्यामुळे त्याला मेयो रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर एसीबीने त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक ओला आणि अपर पोलिस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्जापुरे, पोलिस निरीक्षक प्रवीण लाकडे, प्रीती शेंडे, सारंग बालपांडे, गीता चौधरी, अस्मिता मेश्राम, करुणा सहारे, आशू श्रीरामे आणि अमोल भक्ते यांनी केली. बुधवारी फिरोजला एसीबीच्या विशेष न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी केली जाईल. या कारवाईमुळे मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Share