जिपच्या 98 शाळांची धुरा एकाच शिक्षकावर
देवरी 04: जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार वार्यावर आहे. शिक्षणाधिकारी ते शिक्षक सर्वच पदे रिक्त आहेत. एकीकडे जिपच्या शाळा वाचविण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील तब्बल 98 शाळा एक शिक्षकी असून चार वर्गातील विद्यार्थ्यांना एकच शिक्षक ज्ञानदान करीत आहेत. प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम वेगळा असताना एकाच ठिकाणी बसवून एकच शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवत असेल याची कल्पना न केलेली बरी.
एकेकाळी जिपच्या शाळा विद्यार्थ्यांनी खचाखच भरुन असायच्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या शाळांना गळती लागली आहे. शासनाचे झालेले दुर्लक्ष हे देखील याला कारणीभूत आहे. शासन जिपच्या शाळा टिकवून ठेवण्यासाठी विविध अभियान राबवत असले तरी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गरजेच्या असलेल्या गुरुजींचीच पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शिक्षकच नसल्यामुळे गावातील विद्यार्थी इच्छा नसून देखील खासगी शाळांकडे वळले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 1018 शाळा आहेत. त्या शाळांमध्ये 78 हजार 916 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु शिक्षकांची पदे रिक्त होत असल्याने कार्यरत शिक्षकांवर ताण येतो. गेल्या आठ वर्षांपासून शासनाच्या वतीने शिक्षक भरती घेण्यात आली नाही.
एकीकडे शाळांमध्ये शिक्षक नाहीत, तर दुसरीकडे मात्र डीएड पात्रता धारकांची मोठी बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जिल्ह्यातील 98 शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. या शाळांत एकच शिक्षक चार वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र बसवून शिकवत आहेत. त्यातही विविध प्रशिक्षण व इतर शासकीय कामे यामुळे त्यांना इच्छा असून देखील शिकवताना विद्यार्थ्यांना न्याय देता येत नाही. उल्लेखनीय म्हणजे 98 शाळांत दोन शिक्षकांच्या पदांना मंजुरी आहे. जिल्हा परिषदेच्या या कारभाराचा लाभ खासगी शाळा घेत असून विद्यार्थ्यांना आपलया शाळेत खेचून नेत आहेत.
शिक्षक स्वयंसेवकांची नियुक्ती
शासनाने शिक्षक भरती राबविली नाही. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्याचा ताण विभागावर येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने गावातीलच सुशिक्षित तरुणांना शिक्षक स्वयंसेवक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.
शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी संघटनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. शिक्षकांची कमतरता व त्यातही विविध शासकीय कामे, प्रशिक्षण, बैठका यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यात कमालीची अडचण होत आहे. जिल्हा परिषदेने आता मदत व्हावी म्हणून शिक्षण स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय घेतला असला तरी शिक्षकांची भरती करणे गरजेचे असल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे यांचे म्हणणे आहे.