नव्या शिंदे-फडणवीस सरकारने गोंदिया जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री द्यावा

गोंदिया : जिल्ह्याच्या विकासात पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची असते. जिल्ह्याचा वेगवान विकास करण्यासाठी पालकमंत्री सक‘ीय असणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो स्थानिक असणे अत्यावश्यक. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गोंदिया जिल्ह्यात पूर्व विदर्भा बाहेरील पालकमंत्री दिले होते. जिल्ह्यांतील जनतेचा त्या पालकमंत्र्यांच्या बाबतीतला अनुभव फार चांगला नव्हता. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना तो जिल्ह्यातीलच अनुभवी नेता द्यावा, अशी मागणी गोंदिया जिल्हावासीयांमधून जोर घरू लागली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गोंदिया जिल्हा स्थानिक पालकमंत्र्यांच्या बाबतीत पोरकाच ठरला. फक्त झेंडा वंदन आणि वार्षिक आढावा बैठकीकरीताच पालकमंत्री जिल्ह्यात येत होते. त्यामुळे अनेक बाबतित जिल्ह्यातील विषय मागे पडले. मआ सरकार सत्तरुढ होताच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना गोंदियाचे पालकत्व दिले. त्यांना एका गैरप्रकारात अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांना पदभार देण्यात आला. त्यांनाही ईडीने अटक केली. त्यानंतर तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना गोंदियाचे पालकमंत्र्यांचा पदभार सोपविण्यात आला. ततकली फडणवीस सरकारमध्ये अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना गोंदियाचे पालकमंत्री म्हणुन जबाबदारी देण्यात आली. बडोले यांनी विकास कामाचा सपाटा लावला होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासात्मक कामांसह सामाजिक कामे झाली. आजही ती कामे जनतेच्या स्मरणात आहेत. राजकुमार बडोले यांच्या अनुभवाची आणि कामाची रुपरेषा पाहुन बडोले यांनाच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन शासनाने नियुक्त करावे, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.

Share