एकनाथ शिंदेंनी पदभार स्वीकारला:मुख्यमंत्र्यांच्या दालनात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो

मुंबई: तब्बल दोन आठवड्यांच्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यासाठी एकनाथ शिंदे सकाळी 10 वाजेच्या सुमारास मंत्रालयात दाखल झाले. प्रथम मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्यांनी वंदन केले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात पुजा करुन शिंदेंनी पदभार स्वीकारला.

दालनात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो

एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री कार्यालयात जय्यत तयारी करण्यात आली होती. मंत्रालयातील प्रवेशद्वार आणि मुख्यमंत्री कार्यालयाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री दालनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. यामाध्यमातून शिवसेना व बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचे वारसदार आपणच आहोत, असा ठसवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

बंडखोरही उपस्थित

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे काही बंडखोर आमदारही आज मंत्रालयात पोहोचले. आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर सकाळीच मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले. यावेळी दीपक केसरकर म्हणाले, एकनाथ शिंदे आज पदभार स्वीकारणार आहेत, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. आम्ही मोठी लढाई जिंकल्यानंतर आता महाराष्ट्राच्या विकासासाठी झोकून काम करणार आहोत. तसेच, शिंदे गटातील सर्व आमदारांना आज बोलावले होते. मात्र, पावसामुळे बरेच आमदार आपापल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे ज्यांना शक्य होईल, त्यांनीच यावे, अशी सूचना दिल्याचे केसरकर यांनी सांगितले.

Share