समदं एकदम OK नाय:आमदार निवासातील खोलीचे छत कोसळले

मुंबई-‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील OKमधी हाय सगळं’ असे म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले आहेत. शहाजीबापू पाटील यांच्या मुंबईतल्या आमदार निवासातील खोलीचे छप्पर खाली कोसळल्याने अपघात झाला. जेव्हा ही घटना घडली. तेव्हा शहाजीबापू खोलीमध्येच होते, अशी माहिती आहे. पण, सुदैवाने त्यांना दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत.

दक्षिण मुंबईत मंत्रालयाजवळच्या आकाशवाणी आमदार निवासात शहाजीबापू पाटील यांची खोली आहे. बुधवारी आमदार निवासात आल्यानंतर ते आपल्या खोलीकडे विश्रांतीसाठी गेले. तेव्हा दरवाजा उघडून खोलीत प्रवेश करताच छताचा काही भाग खाली कोसळला. सुदैवाने ते या घटनेतून थोडक्यात वाचले. या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे छताचा काही भाग हा शहाजीबापू यांच्या बेडवरच कोसळ्याचे फोटोतून दिसून येत आहे.

शहाजी पाटील चर्चेत

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद’, या एका डॉयलॉगमुळे शहाजीबापू पाटील अख्ख्या महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शहाजीबापू पाटील गुवाहाटीमध्ये तळ ठोकून होते. तेव्हा अनेक दिवसांपासून शहाजी पाटील यांच्याशी संपर्क न झालेल्या एका कार्यकर्त्याने त्यांना फोन केला. यावेळी आपण आहात कुठे अशी विचारणा कार्यकर्त्याने केली. त्यावर ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, OKमधी हाय सगळं’ असे शहाजी यांनी आपल्या गावरान भाषेत गुवाहाटीचे वर्णन केले होते. त्यांच्या या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. यावरून सोशल मीडियावर मिम्स सुद्धा तयार करण्यात आले. तसेच मराठी यूट्यूबर शंतनू पोळे या तरुणाने शहाजी पाटील यांच्या डायलॉगला संगीत देत भन्नाट गाणे तयार केले. ते गाणेही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

Share