पोलिसांनी तासाभरात शोधले 4 वर्षाच्या वरदला

अर्जुनी मोर : अंगणामध्ये खेळत असलेला 4 वर्षीय बालक अचानक दिसेनासा झाला. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. यानंतर बालकाचे वडील मयूर अतकरी यांनी पत्नीसह अर्जुनी मोर पोलिस स्टेशन गाठून वरद हरविल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून तत्परता दाखवित अवघ्या तासाभरात त्याचा शोध घेऊन आईवडीलांच्या सुपुर्द केले.

अर्जुनी मोर येथील सिव्हिल लाईन निवासी मयूर अतकरी यांचा चार वर्षीय मुलगा वरद हा मंगळवार 5 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत होता. अचानक तो दिसेनासा झाला. अतकरी कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. यानंतर मयूर अतकरी यांनी पत्नीसह अर्जुनी मोर पोलिस स्टेशन गाठले. वरद हरविला असल्याची तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ वरदचा शोध घेण्यासाठी ठाण्यात कार्यरत वीस अंमलदारांना शहरात पाठविले. पोलिस कर्मचारी शहर पिंजून काढत असताना अर्जुनी शहरातील साईनाथ पेट्रोल पंप जवळ पोलिस नायक रमेश सेलोकर, राहुल चिचमलकर यांना वरद दिसला. त्यांनी त्याला ताब्यात घेत वरद मिळाल्याची माहिती अतकरी कुटुंबीयांना दिली. पोलिसांनी वरदला पोलिस स्टेशन येथे आणून अतकरी कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. दरम्यान मयूर अतकरी व त्यांच्या पत्नीने पोलिसांचे आभार मानले.

Print Friendly, PDF & Email
Share