जि. प. च्या शिक्षकांना पत संस्थेच्या निवडणुकीचे वेध
◼️१३ संचालक पदासाठी १४४ नामांकन वैध
गोंदिया 05: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आर्थिक व्यवहाराची जि.प. प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्था आहे या पथसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक येत्या ३१ जुलै ला होणार आहे.
नामांकन अर्ज दाखल व छाणनीची प्रक्रिया पार पडली आहे. दर पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा पत संस्थेची निवडणूक लढविणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त आहे. नामाकंन छाणनी प्रक्रियेनंतर १३ जागांसाठी एकूण १४४ नामांकन वैध ठरले आहेत. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर पत संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. मात्र जि.प. शिक्षकांना पत संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आर्थिक व्यवहाराची प्रमुख पत संस्था म्हणजे जि. प. प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्था आहे. या संस्थेवर आपल्या संघटनेचे वर्चस्व रहावे, यासाठी संघटनेचे पदाधिकारी सातत्याने प्रयत्नरत असतात. संस्थेची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कार्यक्रमानुसार नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ जून पासून सुरू झाली. दरम्यान संस्थेची निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक शिक्षकांची दर पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा मोठी भाऊगर्दी पहावयास मिळाली. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १३ जागांसाठी एकूण १७२ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. छाणनी प्रक्रियेनंतर १४४ नामांकन वैध ठरले आहेत.
यामुळे शिक्षक सहकारी पत संस्थेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार, याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतीम तारिख १९ जुलै आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणाचे चित्र १९ जुलै रोजीची स्पष्ट होणार आहे. असे असले तरी पत संस्थेची निवडणूक चौरंगी होणार, असे दिसून येत आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने प्राथमिक शिक्षक संघ, प्राथ. शिक्षक समिती व प्राथ. शिक्षक संघाचा एक गट तसेच इतर संघटनांचा कृती संघ असे ३ पॅनल निवडणूक लढविणार, हे देखील स्पष्ट पणे दिसून येत आहे. या व्यतिरिक्त स्वतंत्र निवडणूक लढविण्याची संख्या देखील मोठ्याने राहणार, असे माणले जात आहे. एकीकडे निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना निवडणुकीचे वेध लागले आहे.
◼️३३०० पेक्षा अधिक मतदार करणार मतदान
गोंदिया जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पत संस्थेची निवडणूक येत्या ३१ जुलै रोजी पार पडणार आहे. या पत संस्थेच्या मतदार सभासदांची संख्या ३३०० पेक्षा अधिक आहे. हे मतदार १३ संचालकांना निवडणार आहेत.
◼️अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून सर्वाधिक नामांकन
गोंदिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेची निवडणूक होत आहे. आज नामांकन अर्ज छाणनी प्रक्रियेनंतर नामांकनाचे चित्र स्पष्ट झाले. अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील एका जागेसाठी सर्वाधिक २३ नामांकन दाखल झाले आहे. तर भटक्या विमुक्त जाती/जमाती, विशेष मागास वर्गच्या एका जागेसाठी १७ नामांकन, राखीव महिलाच्या दोन जागेसाठी २० नामांकन इतर मागास वर्गच्या एक जागेसाठी १० नामांकन त्याच प्रमाणे पंचायत समिती प्रत्येकी एक जागेसाठी गोंदिया येथे १० नामांकन, गोरेगाव १०, तिरोडा ०९, देवरी १३, सडक अर्जुनी ०७, सालेकसा ०८, अर्जुनी मोरगाव ०८ व आमगाव पंचायत समितीच्या एक जागेसाठी ०९ नामांकन दाखल झाले आहेत.