मागणी असलेल्या पिकांचे उत्पादन घ्या

गोंदिया:शेतकरी आपल्या शेतात विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेत असतात. परंतू काही पिकांच्या उत्पादनाची बाजारपठेत पाहिजे त्या प्रमाणात मागणी होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी ज्या पिकांची बाजारपेठेत मागणी आहे त्याच पिकांचे उत्पादन घ्यावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालक सचिव श्याम तागडे यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ व कृषि विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने माविम जिल्हा कार्यालयातील सभागृहात महिला कौशल्य विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा अक्षिक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, केव्हीकेचे सय्यद अली प्रामुख्याने उपस्थित होते. तागडे पुढे म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत 10 लाखापर्यंत अनुदान आहे.

त्यामुळे या योजनेचा महिला बतचगटांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. प्रत्येक पाच वैयक्तिक व एका गटाचे लक्ष्य निर्धारित करुन ‘जे पिकेल ते विकेल’ या आधारे व्यवसाय सुरु करावे. कृषि संजीवनी ही योजना ग्रामीण विकासासाठी मोठी लाभदायक ठरणार आहे. यासाठी कृषि तसेच विविध विभागांनी गाव स्तरावर शेतकर्‍यांसोबत प्रत्यक्ष चर्चेच्या माध्यमातून उद्योग प्रक्रियाचे नियोजन करुन मार्गदर्शन करावे. ‘एक जिल्हा एक उत्पन्न’ या आधारावर मोठ्या प्रमाणात भात व भाजीपालाचे उत्पादनात वाढ करुन कुटूंबाचे उत्पन्न वाढविण्याची मोठी संधी बाजारपेठेत उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्यावा. माविमच्या माध्यमातून बचतगटाच्या महिलांनी कर्ज घेऊन 99 टक्के कर्जाची परतफेड केली आहे त्याबद्दल पालक सचिवांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी नयना गुंडे म्हणाल्या, जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आरोग्य, शिक्षण, उत्पन्न यावर भर देऊन जास्तीत जास्त महिलांनी उत्पन्न वाढीसाठी सहभागी व्हायले पाहिजे. जिल्ह्यात माविम मार्फत दुग्ध वाढीसाठी यावर्षात 90 दूध संकलन केंद्र उभारण्याचे लक्ष्य घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत तिरोडा तालुक्यात माविम व अदानीच्या माध्यमातून 25 दुग्ध संकलन केंद्र सुरु आहेत. याद्वारे आतापर्यंत 4 लक्ष 15 हजार लिटर दुधाचे संकलन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पाटील म्हणाले, शासनाकडून ज्या योजना सुरु आहेत त्याची पुरेपूर माहिती आपल्याला असायला पाहिजे. प्रकल्प काय आहे याची माहिती करुन घ्यावी, तरच प्रकल्प सिध्दीस जाईल.

उत्पादित वस्तुंची पॅकेजिंग, प्रोसेसिंग व मार्केटिंग या तीन गोष्टींकडे विशेष लक्ष्य देऊन आपले उत्पन्न वाढवावे असे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आम्रपाली महिला बचतगट गोंदिया यांना 6 लक्ष 50 हजार रुपयांचा कर्ज मंजुरीचा धनादेश व उन्नती महिला बचतगट कारंजा यांना 10 लक्ष रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले. संचालन तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले. उपस्थितांचे आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील बचतगटाच्या प्रतिनिधी, उपजिविका सहयोगिनी, उद्योग सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, प्रदिप कुकडकर, प्रफुल्ल अवघड, हेमंत मेश्राम, राम सोनवने, सीएमआरसी स्टाफ यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share